
भारतीय क्रिकेट संघाने सर्व शंका खोट्या ठरवत मँचेस्टरमधील चौथा कसोटी सामना यशस्वीरित्या अनिर्णित राखला. इंग्लंडने या सामन्यात पहिल्या डावात 311 धावांची आघाडी मिळवली होती. मात्र भारताने दीड दिवस बॅटिंग करत दुसऱ्या डावात 4 विकेट्स गमावून 114 धावांची आघाडी घेतली. भारताने त्यानंतर सामना अनिर्णित सोडवला. भारताने अशाप्रकारे सामन्यात पहिल्या 4 दिवसांपर्यंत आघाडीवर असलेल्या इंग्लंडला विजयी होण्यापासून रोखलं. आता उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा 31 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 बदल केले जाऊ शकतात.
भारताने आतापर्यंत प्लेइंग ईलेव्हनमध्ये अनेक बदल केले. वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याने इंग्लंडच्या विरूद्धच्या चौथ्या कसोटीतून पदार्पण केलं. तर साई सुदर्शन आणि शार्दूल ठाकुर या दोघांनी कमबॅक केलं. मात्र त्यानंतरही भारतीय संघ 4 गोलंदाजांसह का खेळली नाही, असा प्रश्न उपस्थित केला गेला. तसेच फिरकीपटू कुलदीप यादव याचा समावेश न केल्यानेही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
आता जे झालं ते झालं. टीम मॅनेजमेंट मागे जे झालं ते विसरुन पाचव्या सामन्याच्या तयारीत आहे. पाचव्या सामन्यासाठीही प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल निश्चित आहे. या सामन्यासाठी 4 बदल केले जाऊ शकतात. उपकर्णधार ऋषभ पंत याला दुखापतीमुळे पाचव्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे पंतच्या जागेवर ध्रुव जुरेल याला संधी मिळू शकते.
पंतव्यतिरिक्त 3 खेळाडूंना कोणतीही दुखापत नसताना बाहेर बसावं लागू शकतं. जसप्रीत बुमराह या मालिकेतील 3 सामने खेळला आहे. बुमराहने ठरल्यानुसार वर्कलोडप्रमाणे या मालिकेतील 3 सामने खेळले आहेत. आता बुमराहला पाचव्या सामन्यात खेळवायचं की नाही? याबाबत टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेतं? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.
तसेच कॅप्टन शुबमन गिल पाचव्या सामन्यासाठी अंशुल कंबोज आणि शार्दूल ठाकुर या दोघांना डच्चू देऊ शकतो. अंशुलने चौथ्या सामन्यातून पदार्पण केलं. मात्र अंशुलला काही खास करता आलं नाही. शार्दूलने पहिल्या डावात झुंजार खेळी केली. मात्र शुबमनने शार्दूलला बॉलिंगची फारशी संधी दिली नाही. यावरुन शुबमनचा शार्दूलवर फार विश्वास नसल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे अंशुल आणि शार्दूलला वगळल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप पाचव्या सामन्यासाठी फिट झाला आहे. तसेच अर्शदीप सिंह हा देखील दुखापतीतून सावरला आहे. या दोघांना दुखापतीमुळे चौथ्या सामन्याला मुकावं लागलं होतं. त्यामुळे आकाशच्या कमबॅकनंतर अंशुलला आपोआप बाहेर बसावं लागेल. तसेच बुमराहला विश्रांती दिल्यास त्याच्या जागी प्रसिध कृष्णा याचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच खेळपट्टी पाहता कुलदीप यादव याची प्रतिक्षा संपेल, अशी चिन्हं आहेत.
पाचव्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, ध्रुव जुरेल, आकाश दीप, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.