ENG vs IND : कॅप्टन शुबमन गिलकडून पहिल्या टेस्टआधी मोठा बदल, तो निर्णय अखेर घेतलाच

India Tour Of England 2025 : टीम इंडिया कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या निवृत्तीनंतर कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ENG vs IND : कॅप्टन शुबमन गिलकडून पहिल्या टेस्टआधी मोठा बदल, तो निर्णय अखेर घेतलाच
Shubman Gill and Rishabh Pant Team India
Image Credit source: Gareth Copley/Getty Images
| Updated on: Jun 19, 2025 | 8:50 AM

लीड्समध्ये टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. उभयसंघात 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील सलामीचा सामना हा 20 जूनपासून आयोजित करण्यात आला आहे. शुबमन गिल या मालिकेपासून कर्णधार म्हणून सुरुवात करणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांचं कॅप्टन गिलच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी निवृत्तीनंतर टीम इंडिया या मालिकेत कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

तसेच रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागी बॅटिंगला कोण येणार? याची उत्सुकता अनेकांना होती. चौथ्या स्थानी बॅटिंगला कोण येणार? याचा निर्णय अखेर झाला आहे. कर्णधार शुबमन गिल चौथ्या स्थानी खेळताना दिसणार आहे.

टीम इंडियाने शुक्रवारी हेडिंग्लेमध्ये सरावाला सुरुवात केली. सरावानंतर उपकर्णधार ऋषभ पंत याने माध्यमांशी संवाद साधला. पंतने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. पंतला कोण कोणत्या स्थानी खेळणार? हा प्रश्न विचारण्यात आला. विराट कोहली याच्या जागी चौथ्या स्थानी कोण खेळणार? हा सर्वात मोठा प्रश्न होता. विराटने इंग्लंड दौऱ्याआधी तडकाफडकी निवृत्ती घेतली. त्यामुळे त्याच्या जागी कोण खेळणार? यासाठी अनेक नावांची चर्चा होती.

नंबर 4 आणि 5

ऋषभ पंतने पत्रकार परिषदेत दिलेल्या उत्तरांमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अपेक्षेनुसार, शुबमन गिल विराट कोहली याची जागा घेणार आहे. “शुबमन चौथ्या स्थानी बॅटिंग करेल. तर मी पाचव्या स्थानी येईन”, अशी माहिती ऋषभ पंत याने दिली.

शुबमन गिल याने ओपनर म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. तसेच गिल 2 वर्षांपासून तिसऱ्या स्थानी खेळत होता. मात्र कर्णधार होताच गिल चौथ्या स्थानी खेळताना दिसणार आहे. तर पंत सहाव्याऐवजी आता पाचव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येणार आहे.

पंत-गिलचं ठरलं

तिसऱ्या स्थानी कोण?

दरम्यान पंतने तिसऱ्या स्थानी कोण खेळणार? हा सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळे या स्थानी कोण खेळणार? याबाबतची चर्चा अजूनही आहे. साई सुदर्शन आणि करुण नायर या दोघांमध्ये तिसऱ्या स्थानासाठी दावेदारी आहे. साईला तिसऱ्या स्थानी संधी दिल्यास करुणला सहाव्या स्थानी यावं लागू शकतं.