ENG vs SL: जो रूट-एटकीन्सनची शतकं, इंग्लंडकडून 427 धावांचा डोंगर, असिथाला 5 विकेट्स
England vs Sri Lanka 2nd Test : इंग्लंडने पहिल्या डावात जो रुट आणि गस एटकीन्सन या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर 400 पार मजल मारली आहे. यजमानांनी पहिल्या डावात सर्वबाद 427 धावा केल्या.

यजमान इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद 427 धावा केल्या आहेत. इंग्लंडला दुसऱ्या दिवशी 3 विकेट्सच्या मोबदल्यात 69 धावाच जोडता आल्या. इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 बाद 357 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून अनुभवी फंलदाज जो रुट आणि गोलंदाज गस एटकीन्सन या दोघांनी शतकी खेळी केली. दोघांनी केलेल्या खेळीमुळे इंग्लंडला 400 पार मजल मारता आली. तर श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडचा पहिला डाव
इंग्लंडकडून जो रुट याने 206 बॉलमध्ये 18 चौकारांच्या मदतीने 143 धावा केल्या. रुटचं हे 33 वं कसोटी तर 49 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. गस एटकीन्सन याने 115 चेंडूत 118 धावा केल्या. एटकीन्सनचं हे पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय शतक होतं. या दोघांव्यतिरिक्त इतर एकालाही खास योगदान देता आलं नाही. खरंतर या दोघांमुळेच इंग्लंडला 400 धावांपर्यंत भरारी घेता आली. इतर फलंदाजांनी श्रीलंकेसमोर गुडघेच टेकले होते. काहींना सुरुवात मिळाली, मात्र त्यांना त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही.
बेन डकेट याने 40, हॅरी ब्रूक 33, मॅथ्यू पॉट्स 21 आणि ओली स्टोन याने 15 धावा केल्या. डॅन लॉरेन्स याने 9, कॅप्टन ओली पोप याने 1, ख्रिस वोक्सने 6 तर शोएब बशीर याने नाबाद 7 धावांचं योगदान दिलं. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो लॉर्ड्समध्ये 5 विकेट्स घेणारा दुसराच गोलंदाज ठरला. तर मिलन रथनायके आणि लहिरु कुमारा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर प्रभाथ जयसूर्याने एक विकेट घेतली.
इंग्लंड पहिल्या डावात 400 पार
Centuries from Joe Root and Gus Atkinson power England to a strong total 👏 #WTC25 | 📝 #ENGvSL: https://t.co/iXrcHn2zhV pic.twitter.com/NuEO5NkFuC
— ICC (@ICC) August 30, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकीन्सन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रथनायके
