ENG vs WI : विंडिजच्या 238 धावांच्या पराभवामागे विराटचा हात, इंग्लंडच्या खेळाडूचा खुलासा
England vs West Indies 1st Odi Match Result : यजमान इंग्लंड क्रिकेट टीमने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडे मॅचमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. इंग्लंडच्या या विजयाचं श्रेय त्यांच्या खेळाडूने विराट कोहली याला दिलं.

इंग्लंड क्रिकेट टीमने हॅरी ब्रूक याच्या नेतृत्वातील पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा तब्बल 238 धावांनी धुव्वा उडवला. एडजबस्टन बर्मिंगघम येथे 29 मे रोजी झालेल्या सामन्यात इंग्लंडने विंडीजसमोर 401 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर विंडीजने गुडघे टेकले. विंडीजचं 26.2 ओव्हरमध्ये 162 रन्सवर पॅकअप करत इंग्लंडने विजयी सलामी दिली. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
आयपीएलच्या 18 व्या मोसमात शानदार कामगिरी केलेला खेळाडू हा इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. आरसीबीकडून खेळलेल्या या खेळाडूने इंग्लंडच्या विजयाचं श्रेय हे विराट कोहली याला दिलं. इतकंच नाही, तर या खेळाडूने त्याची खेळी ही विराट कोहली याला समर्पित केली.
इंग्लंडचा ऑलराउंडर जेकब बेथल याने 53 बॉलमध्ये 8 फोर आणि 5 सिक्ससह 82 रन्स केल्या. तसेच 1 विकेटही घेतली. जेकबला त्याच्या या खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. जेकबने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारताना त्याच्या या खेळीचं आणि विजयाचं श्रेय हे आरसीबी आणि आयपीएलला दिलं.
जेकब बेथल काय म्हणाला?
“मी आयपीएल सुरु होण्याआधी जसा होतो, त्यापेक्षा आता माझ्यात अधिक सुधार झाला आहे”, असं जेकबने म्हटलं. तसेच विराटने त्याचे बॅटिंगचे अनुभव माझ्यासह शेअर केले. तसेच विराटने बॅटिंगमध्ये मदतही केली, याबाबत जेकबने सांगितलं. जेकबने आयपीएल 2025 मध्ये एकूण 2 सामने खेळले. जेकबने या 2 सामन्यांमध्ये 171.79 च्या स्ट्राईक रेटने 67 धावा केल्या. आरसीबीचा विकेटकीपर फील सॉल्ट याची तब्येत बिघडल्याने जेकब बेथल याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. जेकबने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. मात्र जेकबला 2 सामन्यानंतर मायदेशी परतावं लागलं.
जेकब बेथलची अष्टपैलू कामगिरी
We’ve got a real star on our hands in Jacob Bethell ⭐
See every boundary from his incredible innings: https://t.co/hG2xb0BGxw#ENGvWI | #EnglandCricket pic.twitter.com/bTprgHpyDr
— England Cricket (@englandcricket) May 29, 2025
हॅरी ब्रूकच्या नव्या प्रवासाची कडक सुरुवात
दरम्यान हॅरी ब्रूक याने विंडीज विरूद्धच्या या पहिल्या सामन्यातून पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली. हॅरीने त्याच्या नेतृत्वात इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आणि कॅप्टन म्हणून जबरदस्त असं पदार्पण केलं. हॅरी ब्रूकला जोस बटलर याच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. इंग्लंडला काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी स्वीकारत जोस बटलर याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
