
टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक विक्रम केले. सचिनला निवृत्त होऊन अनेक वर्ष लोटली. मात्र त्यानंतरही सचिनचे अनेक विक्रम अबाधित आहेत. सचिनने केलेले वर्ल्ड रेकॉर्ड आजही कायम आहेत. मात्र सचिनचे काही विक्रम ब्रेक होऊ शकतात, हे इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने दाखवून दिलं आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत जो रुट सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करु शकतो. रुटने एका विक्रमाबाबत वेस्टइंडिजचा माजी दिग्गज शिवनारायण चंद्रपॉल याची बरोबरी केली आहे. आता रुट सचिनला पछाडण्याच्या वाटेवर आहे.
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने टेस्टमध्ये सर्वाधिक 51 शतकं झळकावली आहेत. सचिनचा हा विक्रम आणखी काही वर्ष कायम राहू शकतो. सचिनच्या या महारेकॉर्डच्या आसपासही कुणी नाही. तसेच कसोटीत सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. सचिनने टेस्टमध्ये 68 अर्धशतकं केली आहेत. सचिननंतर या यादीत दुसर्या स्थानी चंद्रपॉल विराजमान आहे. चंद्रपॉलने 66 अर्धशतकं केली आहेत. रुटने चंद्रपॉलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
जो रुट याने टीम इंडिया विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 371 विजयी धांवाचा पाठलाग करताना 53 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली होती. रुटचं हे कसोटीतील 66 वं अर्धशतक ठरलं. आता रुटला सचिनच्या वर्ल्ड रेकॉर्डच्या बरोबरीसाठी फक्त 2 तर महाविक्रम स्वत:च्या नावावर करण्यासाठी 3 अर्धशतकांची गरज आहे.
कसोटीत सर्वाधिक 50+ धावांचा विक्रम सचिनच्याच नावे आहे. सचिनने 20 कसोटी सामन्यांमध्ये 119 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर जॅक कॅलिस दुसऱ्या स्थानी आहे. कॅलिसने 103 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने 103 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर जो रुट चौथ्या स्थानी आहे.
दरम्यान इंग्लंड या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आणखी 4 सामने बाकी आहेत. रुट या 4 सामन्यांसाठी उपलब्ध राहिल्यास एकूण 8 डावात फलंदाजी करण्याची संधी मिळेल. त्यामुळे जो रुट सचिनला पछाडू शकतो. आता रुट सचिनचा हा वर्ल्ड रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करण्यात किती यशस्वी होतो? हे येत्या काही आठवड्यांमध्येच स्पष्ट होईल.