WTC 2027 : इंग्लंडने भारताच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरलं, श्रीलंका-बांग्लादेश ठरले वरचढ

भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावला. पाच शतकं ठोकूनही गचाळ क्षेत्ररक्षण आणि सुमार गोलंदाजीमुळे भारताचा पराभव झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 स्पर्धेची सुरुवात पराभवाने झाली आहे.

WTC 2027 : इंग्लंडने भारताच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरलं, श्रीलंका-बांग्लादेश ठरले वरचढ
WTC 2027 : इंग्लंडने भारताच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरलं, श्रीलंका-बांग्लादेश ठरले वरचढ
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 24, 2025 | 10:59 PM

अँडरसन-तेंडुलकर कसोटी सामन्याच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने सरशी घेतली. खरं तर पहिल्या डावात 6 धावांची आघाडी घेतली होती. तसेच दुसऱ्या डावात विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताला हे आव्हान काही रोखता आलं नाही. इंग्लंडने होम ग्राउंडचा पूर्णपणे फायदा घेत भारताला चीतपट केलं. भारताला खरं तर या सामन्यात विजयाची संधी चालून आली होती. पण हातात असलेले झेल सोडल्याने धावांचा फटका बसला. जीवदान मिळाल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी बरोबर डाव साधला. एकट्या यशस्वी जयस्वालने 4 झेल सोडले. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची सुरुवात पराभवाने झाली. इंग्लंडने पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने पुढच्या सामन्यात काही खरं नाही अशीच भावना आता क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. भारताने ही मालिका मोठ्या फरकाने गमावली तर अंतिम फेरीचं स्वप्न भंगण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यानंतर विजयी टक्केवारीची रिकव्हरी करणं खूपच कठीण जाणार आहे.

इंग्लंडने भारताला पराभूत केल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडचे 12 गुण झाले असून विजयी टक्केवारी 100 आहे. त्यात भारताच्या पारड्यात पराभव पडल्याने विजयी टक्केवारी शून्य ठरली आहे. त्यामुळे भारतीय संघाची क्रमवारीत श्रीलंका आणि बांगलादेशखाली घसरण झाली आहे. बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे त्या दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण मिळाले आणि विजयी टक्केवारी 33.33 टक्के आहे. आता भारताचा पुढचा कसोटी सामना 2 जुलैला होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर काही शिकणार का? असा प्रश्न आता क्रीडाप्रेमी विचारत आहेत.

शुबमन गिलने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. तरी भारताने पहिल्या डावात 471 धावांचा डोंगर रचला. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 465 धावा केल्या. भारताकडे पहिल्या डावात 6 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात भारताने या आघाडीसह 364 धावा केल्या आणि एकूण 370 धावा झाल्या. विजयासाठी भारताने इंग्लंडसमोर 371 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडने हे आव्हान तीन गडी गमवून पूर्ण केलं.