
भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील ही पहिलीच मालिका असणार आहे. टीम इंडिया नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होणं बाकी आहे. मात्र या मालिकेनिमित्ताने टीम इंडियाची या दौऱ्यात खऱ्या अर्थाने ‘कसोटी’ असणार आहे. टीम इंडियाला या मालिकेत कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार? हे सविस्तर जाणून घेऊयात. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या 2 अनुभवी आजी-माजी कर्णधारांनी तडकाफडकी निवृत्ती घेतली. त्यामुळे भारताच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. त्यामुळे आता नव्या खेळाडूंसाठी मोठ्या प्रमाणात या दौऱ्यात आव्हान असणार आहेत. ...