WTC Points Table : इंग्लंडच्या विजयानंतर गुणतालिकेवर पडला फरक, टीम इंडियाला काय करावं लागणार?
टी20 वर्ल्डकपनंतर पुन्हा एकदा वनडे आणि कसोटी क्रिकेटची चर्चा सुरु आहे. फेब्रुवारी महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी, तर जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप असणार आहे. आयसीसीच्या या दोन्ही स्पर्धा महत्त्वाच्या असून क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने प्रत्येक कसोटी सामना महत्त्वाचा आहे. असं असताना इंग्लंडने वेस्ट इंडिजला पराभूत करताच काय फरक पडला ते जाणून घ्या.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर पुन्हा एकदा कसोटी पर्व सुरु झालं आहे. दर दोन वर्षांनी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा होते. यासाठी दोन वर्षे कसोटी साखळी सामने चालतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 हे तिसरं पर्व आहे. यापूर्वी झालेल्या दोन पर्वात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. तर भारताला दोन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे यावेळेस टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर नाव कोरेल असा विश्वास आहे. त्यामुळे प्रत्येक कसोटी सामन्यावर लक्ष ठेवावं लागत आहे. इंग्लंडने वेस्ट इंडिजला एक डाव आणि 114 धावांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे निश्चितच गुणतालिकेवर फरक पडला आहे. पराभवामुळे वेस्ट इंडिजला फटका बसला आहे. पराभवानंतरही वेस्ट इंडिजचा संघ सहाव्या स्थानावर आहे. विजयी टक्केवारीत घट झाली आहे. या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजची विजयी टक्केवारी ही 33.33 इतकी होती. मात्र पराभव होताच टक्केवारी 26.66 इतकी झाली आहे.
दुसरीकडे, इंग्लंडला या विजयामुळे जबरदस्त फायदा झाला आहे. इंग्लंडचा संघ गुणतालिकेत सध्या नवव्या स्थानावर आहे. यापूर्वी विजयी टक्केवारी 17.50 इतकी होती.आता विजय मिळवताच ही टक्केवारी 25 वर पोहोचली आहे. या मालिकेतील दुसरा सामना जिंकला तर गुणतालिकेत मोठी उलथापालथ होईल. दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेशला धोबीपछाड देईल. तसेच वेस्ट इंडिजला जबर फटका बसेल. इंग्लंड थेट नवव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेईल. न्यूझीलंड आणि श्रीलंकेची विजयी टक्केवारी 50 आहे. त्यामुळे संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. पाकिस्तान 36.66 विजयी टक्केवारीसह पाचव्या, तर दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश 25 विजयी टक्केवारीसह सातव्या आणि आठव्या स्थानी आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ टॉपला आहे. भारताची विजयी टक्केवारी 68.51 इतकी आहे. तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया संघ असून विजयी टक्केवारी 62.50 इतकी आहे. त्यामुळे या दोन संघात फार काही फरक नाही. त्यामुळे टीम इंडियाला आगामी कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून तीन सामन्यांची कसोटी मालिका होईल. त्यानंतर खरी कसोटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लागणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
