
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. साखळी फेरीत इंग्लंडने दक्षिण अफ्रिकन फलंदाजांना वेसण घातलं होतं. मात्र उपांत्य फेरीत तसं काही झालं नाही. उलट दक्षिण अफ्रिकन संघाने सावध खेळी करत मोठी धावसंख्या उभारली आहे. दक्षिण अफ्रिकेने 50 षटकात 7 गडी गमवून 319 धावा केल्या आहे. तसेच विजयासाठी 320 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान इंग्लंडचा संघ गाठतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सामन्यातील विजयी संघाची लढत अंतिम फेरीत भारत किंवा ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्यामुळे कोणाला अंतिम फेरीचं तिकीट मिळतं याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
दक्षिण अफ्रिकेकडून लॉरा वॉल्वार्ड हीने चिवट खेळी केली. 150 हून अधिक धावा करत संघाला कठीण परिस्थितीतून सावरलं. तिने पहिल्या विकेटसाठी ताझमिन ब्रिट्ससोबत 116 धावांची भागीदारी केली. ताझमिन 45 धावा करून बाद झाली आणि पुढे दोन विकेट धडाधड पडल्या. एनेक बॉशला खातंही खोलता आलं नाही. तर सुने लूस फक्त एक धाव करून बाद झाले. त्यानंतर मरिझेन कापने 42 धावांची खेळी करत लॉराला साथ दिली. दोघांमध्ये 72 धावांची भागीदारी झाली. ही जोडी फुटली आणि पुन्हा दोन विकेट झटपट बाद झाल्या. सिनालो जाफ्ता 1, तर एनेरी डर्कसेन 4 धावा करून बाद झाली. लॉरा वॉल्वार्डने 143 चेंडूत 20 चौकार आणि 4 षटकार मारत 169 धावांची खेळी केली. क्लो ट्रायॉनने नाबाद 33 आणि नादिन डी क्लार्कने नाबाद 11 धावांची खेळी केली.
इंग्लंडकडून सोफी एक्सलस्टोन प्रभावी गोलंदाज ठरली. तिने 10 षटकात 44 धावा देत 4 गडी बाद केले. तर नॅट सायव्हर ब्रंटने 8 षटकं टाकत 67 धावा देत 1 गडी बाद केला. आता इंग्लंडच्या फलंदाजांचा कस लागणार आहे. 1973 पासून सुरु झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने एकदाही अंतिम फेरी गाठलेली नाही. त्यामुळे इंग्लंडला पराभूत केल्यास नवा विजेता मिळू शकतो. तर इंग्लंडने यापूर्वी 8 वेळा अंतिम फेरीत जागा मिळवली आहे. तसेच चारवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.