Asia Cup 2025 : जे आहे तेच म्हटलं, सेहवाग सूर्याबाबत स्पष्टच म्हणाला

Virender Sehwag on Suryakumar Yadav : टीम इंडियाचा माजी आणि विस्फोटक ओपनर बॅट्समन वीरेंद्र सेहवाग याने टी 20i कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्याबाबत आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे.

Asia Cup 2025 : जे आहे तेच  म्हटलं, सेहवाग सूर्याबाबत स्पष्टच म्हणाला
Suryakumar Yadav and Virender Sehwag
Image Credit source: TV9
| Updated on: Aug 22, 2025 | 10:52 PM

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर आशिया कप 2025 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यात शुबमन गिल याच्या नेतृत्वात 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. त्यानंतर आता टीम इंडिया आशिया कप स्पर्धेच्या निमित्ताने एक्शन मोडमध्ये असणार आहे. बीसीसीआय निवड समितीने 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली. त्यामुळे या स्पर्धेत कोण खेळणार आणि कोण नाही? हे चित्र स्पष्ट झालं आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेआधी टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने सूर्यकुमारबाबत खूप काही म्हटलं.

रोहित शर्मा याने भारताला त्याच्या नेतृत्वात 2024 साली वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यानंतर रोहितने टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहितच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव टी 20i संघाचं नेतृत्व करत आहे. सेहवागने सूर्याच्या नेतृत्वाबाबत विधान केलं. टीम इंडिया पुन्हा एकदा आशिया कप स्पर्धेत धमाल करेल. सूर्यासाठी कर्णधार म्हणून ही पहिली सर्वात मोठी स्पर्धा असेल, असं सेहवागने म्हंटल.

आशिया कपसाठी भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचं योग्य संतुलन असल्याचं सेहवागने म्हटलं. तसेच सूर्याचा आक्रमकपणा हा टी 20i फॉर्मेटसाठी योग्य आहे. टीम इंडियाने कॅप्टनच्या योजनेनुसार खेळ केला तर पुन्हा आशिया कप जिंकेल, असा विश्वास सेहवागने व्यक्त केला.

सेहवागने काय म्हटलं?

“भारतीय संघात युवा आणि अनुभवाचं योग्य मिश्रण आहे. तसेच सूर्यकुमार यादव याच्या निर्भीड नेतृत्वात ते पुन्हा एकदा आशियात आपला दबदबा तयार करु शकतात. त्याची (सूर्यकुमार यादव) आक्रमक मानसिकता टी 20 फॉर्मेटसाठी योग्य आहे. टीम त्याच उत्साहाने खेळली तर टीम इंडियाच ट्रॉफी उंचावेल, यात मला शंका नाही”, असं सेहवागने सोनी स्पोर्ट्सवर एका कार्यक्रमात म्हटलं.

दरम्यान आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे यूएईत करण्यात आलं आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आह. तर अंतिम सामना हा 28 सप्टेंबरला होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे अबुधाबी आणि दुबईमधील क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. एकूण 8 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान, ओमान आणि यूएई ए ग्रुपमध्ये आहेत. तर श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग बी ग्रुपमध्ये आहेत.

टीम इंडिया आशिया कप मोहिमेतील आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 14 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. तर टीम इंडिया साखळी फेरीतील आपला तिसरा आणि अंतिम सामना हा 19 सप्टेंबरला ओमान विरुद्ध खेळणार आहे.