IND vs PAK : 5-3-3,पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनचा फॉर्म्युला!
Asia Cup 2025 Team India Playing XI Against Pakistan : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना कायम प्रतिक्षा असते. चाहत्यांची ही प्रतिक्षा आता काही तासांनीच संपणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना 14 सप्टेंबरला होणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी 10 सप्टेंबरला आशिया कप 2025 स्पर्धेत अप्रतिम सुरुवात केली. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात तुलनेत लिंबुटिंबु यूएईवर सहज आणि सोपा विजय मिळवला. भारताने यूएईला 57 धावांवर ऑलआऊट केलं. यूएईची टी 20i क्रिकेटमधील सर्वात निच्चाकी धावसंख्या ठरली. त्यानंतर भारताने 4.3 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून विजयी आव्हान पूर्ण केलं. आता टीम इंडिया या स्पर्धेतील आपला दुसरा सामना 14 सप्टेंबरला खेळणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे, त्याचं कारणही तसंच आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला
रविवारी 14 सप्टेंबरला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर या सामन्याला तीव्र विरोध करण्यात येत होता. मात्र भारत सरकारने या सामन्याला ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे हा सामना होणार असल्याचं निश्चित आहे. मात्र त्यानंतरही अनेकांचा या सामन्याला तीव्र विरोध आहेच.
उभयसंघातील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. या महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनचा फॉर्म्युला कसा असू शकतो, याचे संकेत मिळाले आहेत. भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा याने प्लेइंग ईलेव्हनबाबत काय म्हटलंय हे जाणून घेऊयात.
पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण असणार हे अजय जडेजा यांनी केलेल्या चर्चेतून स्पष्ट होतं. जडेजाने यूएई विरूद्धच्या सामन्यादरम्यान केलेल्या चर्चेतून प्लेइंग ईलेव्हनचा फॉर्म्युला निश्चित आहे, असं म्हटलं तक चुकीचं ठरणार नाही. अजय जडेजा यांच्यानुसार, यूएई विरुद्धचेच 11 खेळाडू पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरणार आहेत. थोडक्यात काय तर भारताच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल होणार नाही. टीम इंडियाचा यूएई विरुद्ध प्लेइंग ईलेव्हनचा फॉर्म्युला हा 5 (फलंदाज) 3 (अष्टपैलू) 3 (गोलंदाज) असा होता.साधारणपणे विजयी संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला जात नाही. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध याच 11 खेळाडूंसह मैदानात उतरेल, अशी दाट शक्यता आहे.
अजय जडेजा यांच्यानुसार पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर) हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
