IPL 2026 खेळण्याची दोन खेळाडूंना मिळणार शिक्षा, झालं असं की…

आयपीएल 2026 स्पर्धेत खेळणाऱ्या दोन खेळाडूंवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुझरबानी आणि श्रीलंकेच्या दासुन शनाका यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. खेळाडूंना ऐन वेळी आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला.

IPL 2026 खेळण्याची दोन खेळाडूंना मिळणार शिक्षा, झालं असं की...
IPL 2026 खेळण्याची दोन खेळाडूंना मिळणार शिक्षा, झालं असं की...
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 23, 2026 | 4:08 PM

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 28 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरूवात होणार आहे. आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यानंतर लगेचच पाकिस्तान सुपर लीगही सुरू होणार आहे. मात्र आयपीएल स्पर्धेत भाग घेणाऱ्या दोन खेळाडूंवर कारवाई करण्याची तयारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून केली जाण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुझरबानी आणि श्रीलंकेच्या दासुन शनाका यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. या दोन्ही खेळाडूंनी ऐनवेळी पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून माघार घेतली आणि आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील संघांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. रावलपिंडी पिंडीजचे मालक एहसान ताहिर यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे मागणी केली की, संघ सोडून गेलेल्या दासुन शनाका आणि ब्लेसिंग मुझरबानी यांच्यावर तात्काळ बंदी घालावी.

एहसान ताहिर यांनी सांगितलं की, पाकिस्तानची प्रतिमा डागळणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाईची गरज आहे. या खेळाडूंमुळे पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या छबीला ठेच लागली आहे. दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनीही सोडून गेलेल्या खेळाडूंवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. दासुन शनाका याने लाहोर कलंदर्स सोडून राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याचा निर्णय घेताल आहे. सॅम करन दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला संघात घेतलं आहे. तर ब्लेसिंग मुझरबानी हा कोलकात नाईट रायडर्सकडून खेळणार आहे. मुस्तफिझुर रहमानला संघातून काढल्यानंतर त्याची रिप्लेसमेंट म्हणून घेतलं आहे.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेला अनेक विदेशी खेळाडू रामराम ठोकत आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉनसनही पीएसएल सोडून चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात रूजू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएसएल स्पर्धा अडचणीत आल्याचं दिसत आहे. त्यात या स्पर्धेचं आयोजन योग्य रितीने करण्याचं आव्हान पाकिस्तान क्रिकेट बोर्डापुढे असणार आहे. दरम्यान, इराण-इस्राईल युद्धामुळे पाकिस्तानात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत प्रेक्षकांना एन्ट्री नसेल असं बोललं जात आहे.

मोहसिन नकवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, या स्पर्धेचं आयोजन फक्त कराची आणि लाहोरमध्ये होणार आहे. प्रेक्षकांना ही स्पर्धा मैदानात उपस्थित राहून पाहता येणार नाही. इतकंच काय तर या स्पर्धेपूर्वी रंगारंग कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

Follow Us