टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर गौतम गंभीरने अखेर मौन सोडलं, म्हणाला…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात याची नांदी दिसून आली आहे. दुबळे समजले जाणारे संघही या स्पर्धेत उलटफेर करण्याची ताकद ठेवतात हे दिसून आलं आहे. त्यामुळे ही स्पर्धा वाटते तितकी सोपी नाही हे दिसून येते. असं असताना गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची चर्चा रंगली आहे. यात गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर गौतम गंभीरने अखेर मौन सोडलं, म्हणाला...
| Updated on: Jun 03, 2024 | 4:48 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाला नवा कोच मिळणार हे स्पष्ट झालं आहे. पण त्या पदावर नेमकी कोणती व्यक्ती बसणार याची खलबतं सुरु आहेत. हेड कोचच्या रेसमध्ये गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे. गौतम गंभीर आणि बीसीसीआयमधील चर्चेला अंतिम स्वरूप प्राप्त झालं आहे. त्यामुळे गौतम गंभीरच्या नावाची फक्त घोषणा होणं बाकी असल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे. पण अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान गौतम गंभीरने दुबईतील एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्याच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. तुम्हाला टीम इंडियाचं प्रशिक्षकपद भूषवायला आवडेल का? भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात मदत कराल का? असे प्रश्न गौतम गंभीरला विचारण्यात आले. तेव्हा गौतम गंभीरने या सर्व प्रश्नांची तितक्याच सावधपणे उत्तरं दिली. “भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होणं यासारखा मोठा सन्मान नाही. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होणं म्हणजे 140 कोटी भारतीयाचं प्रतिनिधित्व करण्याची संध मिळते. ही मोठी गोष्ट आहे.”, असं सांगून गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाच्या बातम्यांना बळ दिलं.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत अनेक दिग्गजांनी भाग घेतला होता. मात्र एक एक करत सर्वच पिछाडीवर पडले. ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर आणि श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा याचंही नाव चर्चेत होतं. पण या सर्वांना धोबीपछाड देत गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आलं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर 1 जुलैपासून ही माळ गौतम गंभीरच्या गळ्यात पडेल असं बोललं जात आहे.

गौतम गंभीरने 4 डिसेंबर 2018 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानंतर काही महिन्यातच भाजपा पक्षात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटसाठी खासदारकीचा राजीनामा दिला आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर झाला. त्यानंतर आता टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या रेसमध्ये आहेत. गौतम गंभीरने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. गौतम गंभीरने 58 कसोटी, 147 वनडे, 37 टी20 सामने खेळला आहे.