
गतविजेच्या टीम इंडियासमोवर पुन्हा एकदा जेतेपद मिळवण्याचं आव्हान आहे. भारतातच ही स्पर्धा असल्याने टीम इंडियाकडून तशीच अपेक्षा आहे. असं असताना जेतेपदाची आस ठेवून भारतीय संघाची घोषणा केली आह. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. आयसीसी स्पर्धेत सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. संघाची घोषणा झाल्यानंतर पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या पत्रकारांनी सूर्यकुमार यादव आणि अजित आगरकर यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी सूर्यकुमार यादवने एक गुपित उघड केलं आहे. यामुळे टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरने युटर्न घेतल्याचं दिसून येत आहे. गंभीरने प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतल्यापासून व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजीत प्रयोग करताना दिसला. इतंकच काय तर ओपनर सोडून इतर फलंदाजांनी कुठेही फलंदाजी करण्यास सज्ज असावं असंही गंभीर म्हणाला होता.
गौतम गंभीरच्या या प्रयोगाचा परिणाम टीम इंडियावर होताना दिसत होता. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत असंच काहीसं पाहायला मिळालं होतं. पण आता गौतम गंभीरने या निर्णयातून युटर्न घेतला आहे. कारण सूर्यकुमार यादवने त्याच्या आणि तिलक वर्माच्या बॅटिंग पोजिशनबाबत मोठा खुलासा केला आहे. सूर्यकुमार यादवने सांगितलं की, ‘आम्ही तिलक वर्मासाठी तिसरा क्रमांक निश्चित केला आहे. मी चौथ्या क्रमांकावर असेल.’ म्हणजेच सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या बॅटिंग पोझिशनबाबत निर्णय घेतला आहे.
तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही त्याला या पोझिशनवर फलंदाजीला संधी मिळणार आहे. या दोघांना त्यांची मजबूत पोझिशन देण्यात आली आहे. तसेच त्यांची भूमिकाही स्पष्ट करण्यात आली आहे. भूमिका निश्चित असल्याने टीम इंडियाला फायदा होऊ शकतो. दुसरीकडे, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ओपनिंग करणार हे स्पष्ट झालं आहे. कारण या संघात शुबमन गिल नसल्याने हे चित्र स्पष्ट झालं आहे. हार्दिक पांड्या पाचव्या, शिवम दुबे सहाव्या आणि अक्षर पटेल सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकतो. वॉशिंग्टन सुंदर आठव्या, वरूण चक्रवर्ती नवव्या, अर्शदीप सिंह दहाव्या आणि जसप्रीत बुमराह शेवटी फलंदाजीला उतरू शकतो. इशान किशन, हार्षित राणा आणि रिंकु सिंहला संघाच्या स्थितीनुसार प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.