खराब फॉर्मवर कर्णधार सूर्यकुमार यादव अखेर व्यक्त झाला, वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी म्हणाला…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा खेळाडूंच्या फॉर्मवर झाली आहे. पण कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म काही चांगला नाही. त्याला मागच्या टी20 मालिकांमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी त्याने क्रीडाप्रेमींना एक आश्वासन दिलं आहे.

भारताने टी20 मालिका जिंकण्याचा सपाटा लावला आहे. पण असं असताना टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या काही मालिकांमध्ये सूर्यकुमार यादव याची खेळी पाहता कर्णधार असल्यानेच संघात स्थान मिळत असल्याचं जाहीर झालं आहे. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात उतरणार आहे. तर उपकर्णधार शुबमन गिलला डावलण्यात आलं आहे. त्याच्याऐवजी ही जबाबदारी अक्षर पटेलच्या खांद्यावर दिली आहे. बीसीसीआयने संघाची घोषणा केल्यानंतर पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवच्या फॉर्मबाबत प्रश्न विचारले गेले. त्याची टी20 तील सरासरी 15 च्या आसपास आहे. 2025 या वर्षातील 19 डावात 13.62 च्या सरासरीने 218 धावा केल्या आहे. यात एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. यावर खुद्द सूर्यकुमार यादवने स्पष्टीकरण दिलं.
सूर्यकुमार यादवने आपल्या खराब फॉर्मबाबत सांगितलं की, ‘मला माहिती आहे की मला काय करायचं आहे आणि मी ते करणार आहे. तुम्ही निश्चितपणे सूर्यकुमार यादवची फलंदाजी पाहाल. ही वेळ खूप लांब होती. पण यापूर्वीही अनेक खेळाडू खराब फॉर्मातून परतले आहेत.’
सूर्यकुमार यादव संघाबाबत म्हणाला की ” कोणताही संघ खेळू द्या. आम्ही खेळलेल्या कोणत्याही द्विपक्षीय सामन्याप्रमाणे दोन तीन खेळाडू येतात आणि जातात. जेव्हा खेळाडू परततात तेव्हा त्यांना संधी मिळते. आम्ही सध्या जिथे आहोत तिथे आम्ही आनंदी आहोत. आमच्याकडे असलेल्या संघात दोन तीन संघ तयार आहेत. म्हणून, सध्या आमच्याकडे जे आहे त्यावर आम्ही आनंदी आहोत.”
सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, ‘आम्ही अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे गौती भाई आणि मी, इतर फलंदाजांसह, डावखुरा आणि उजवा असं काही आमच्यासाठी आवश्यक नाही. हे थोडे जास्त झाले आहे. आम्ही तिलकसाठी तिसऱ्या क्रमांकावर, माझ्यासाठी चौथ्या क्रमांकावर आणि नंतर जो सोयीस्कर असेल तो निवडला आहे. आम्ही तिलकसाठी ती भूमिका स्थापित करू इच्छितो जेणेकरून त्याला त्याची भूमिका काय आहे हे कळेल आणि त्या स्थितीत तो आरामदायी असेल.”
