T20 World Cup 2026 स्पर्धेपूर्वी बदलणार टीम इंडिया? आयसीसीचा हा नियम जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून आता काही दिवसच शिल्लक आहेत. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. संघ निवडताना निवडकर्त्यांनी काळजी घेतली आहे. पण या संघातही ऐनवेळी बदल केले जाऊ शकतात. कसं काय ते समजून घ्या

Team India Squad For T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियात कोण खेळणार? कोणाला डावललं जाणार? वगैरे प्रश्न अनेकांना पडले होते. पण संघाची घोषणा होताच यावरचा पडदा दूर झाला आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली संघाची घोषणा केली आहे. या संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे असून उपकर्णधारपदाची धुरा अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. तर शुबमन गिल, जितेश शर्मा यांना वगळण्यात आलं आहे. इशान किशन आणि रिंकु सिंह यांचं संघात कमबॅक झालं आहे. या स्पर्धेला दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. असं असताना या संघात काही बदल केले जाणार का? असाही प्रश्न विचारला जात आहे. त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.
आयसीसी नियमानुसार, मल्टी नॅशनल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी एक महिन्याआधी सर्वच संघांना संघ जाहीर करणं भाग असतं. टी20 वर्ल्डकप स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संघाची घोषणा करणं भाग आहे. म्हणजेच संघांना 7 जानेवारीपर्यंत संघ जाहीर करणं भाग आहे. भारताने हा संघ 20 डिसेंबरलाच जाहीर केला आहे. म्हणजेच यात काही बदल करायचा झाला तर बीसीसीआय 7 जानेवारीपर्यंत बदल करू शकते.
7 जानेवारीनंतर कसा संघ बदलणार?
7 जानेवारीनंतर संघ बदलला जाऊ शकतो का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. पण हा निर्णय घेण्याचा अधिकार बीसीसीआयकडे नाही. यासाठी आयसीसीच्या टेक्निकल कमिटीची मंजुरी घ्यावी लागेल. संघातील बदल मुख्यत्वे करून एखादी गंभीर स्थिती उद्भवली तरच होतो. म्हणजे एखादा खेळाडू गंभीररित्या जखमी झाला वगैरे तरच त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी मिळेल. या प्रकरणात मेडिकल रिपोर्टची सखोल चौकशी केली जाईल. त्यानंतर संघात बदल केला जाईल. पण आयसीसीने नकार दिल्यास संघात बदल केला जाणार नाही.
टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार),अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, रिंकू सिंह.
