
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत भारत अ गटात असून पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा हे संघ आहे. या गटातून भारत आणि पाकिस्तान आरामात सुपर 8 फेरीत जाणार असं अनेकांचं म्हणणं आहे. पण आयर्लंडचा मागचा इतिहास पाहिला तर पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहाणार नाही. 2007 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आधीच आयर्लंडने पाकिस्तानला लोळवून दाखवलं आहे. पाकिस्तानला 132 धावांवर रोखलं होतं तसेच ही धावसंख्या 3 गडी राखून गाठली होती. नुकत्याच झालेल्या पाकिस्तान आयर्लंड मालिकेतही याची चुणूक दिसून आली आहे. पहिल्याच टी20 सामन्यात पाकिस्तानला धोबीपछाड दिला होता. दुसरीकडे, भारतीय संघ जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात आयर्लंडला गेला होता. तेव्हाही पहिल्या सामन्यात पाऊस पडला आणि डीएलएस नियमाने फक्त 2 धावांनी जिंकलो होतो. दुसरा सामना भारताने 33 धावांनी जिंकला आणि तिसरा सामना पावसामुळे झाला नाही. ही मालिका भारताने 2-0 ने जिंकली. भारताच्या तुलनेत आयर्लंडचा संघ दुबळा असला तरी हलक्यात घेऊन चालणार नाही. अन्यथा स्पर्धेच्या साखळी फेरीतच भारताची नाचक्की होण्यास वेळ लागणार नाही.
भारत आणि आयर्लंड यांच्यात 5 जूनला सामना होणार आहे. टी20 क्रिकेटमध्ये भारत आयर्लंड यांच्या एकूण 7 सामने झाले आहे. हे सर्व सामने भारताने जिंकले आहेत. 2009 ते 2023 दरम्याने हे सर्व सामने खेळले गेले आहेत. आता 2024 मध्ये पहिल्यांदाच हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. 15 वर्षानंतर भारत आणि आयर्लंड यांच्यात सामना होणार आहे. यापूर्वी 2009 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदा आमनेसामने आले होते. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने तेव्हा 8 गडी राखून विजय मिळवला होता. तेव्हा रोहित शर्माने नाबाद 52 धावा केल्या होत्या. आता रोहित शर्मा कर्णधार आहे.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. राखीव खेळाडू: शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.
आयर्लंड: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्रयू बालबर्नी, कर्टिस कँपर, गॅरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, ग्राहम ह्यूम, जोश लिटिल, बैरी मैक्कार्थी, नील रॉक, हैरी टेक्टर, लोर्कन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग.