ICC Womens World Cup 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना केव्हा?
ICC Womens World Cup 2025 : आयसीसी वू्मन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेला केव्हापासून सुरुवात होणार? पाहा वेळापत्रक.

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे आहे. या स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. साखळी फेरीत एकूण 28 सामने खेळवण्यात येणार आहेत. राउंड-रॉबिन फॉर्मेटनुसार ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून 5 स्टेडियममध्ये सामने होणार आहेत. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडियाचा पहिला सामना हा 30 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना हा बंगुळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामनाही चिन्नास्वामी स्टेडियममध्येच होणार आहे. तसेच पाकिस्तान अंतिम फेरीत पोहचली तर अंतिम सामना हा कोलंबोत होणार आहे. बाद फेरीतील सामना 29 ऑक्टोबरला गुवाहाटी किंवा कोलंबोत होईल. तर उपांत्य फेरीतील दुसरा सामना हा 30 ऑक्टोबर रोजी बंगळुरुत आयोजित करण्यात आला आहे. तर अंतिम सामना 2 नोव्हेंबरला होणार आहे.
एकूण 5 स्टेडियममध्ये स्पर्धेचं आयोजन
वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने हे एकूण 5 स्टेडियममध्ये होणार आहेत. त्या 5 पैकी 4 स्टेडियम भारतातील आहेत. भारतात एम चिन्नास्वामी स्टेडियम (बंगळुरु), गुवाहाटीतील एसीए स्टेडियम, इंदूरमधील होळकर स्टेडियम आणि विशाखापट्टणममधील एसीए-व्हीडीसीए स्टेडियममध्ये सामने खेळवण्यात येतील. तर श्रीलंकेत आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सामन्याचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.
8 संघांमध्ये कोण कोण?
वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 8 संघ पात्र ठरले आहेत. या 8 संघांमध्ये भारत , श्रीलंका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि पाकिस्तानचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया गतविजेता असल्याने त्यांच्यासमोर वर्ल्ड कप राखण्याचं आव्हान असणार आहे.
ऑस्ट्रेलिया सर्वात यशस्वी संघ
ऑस्ट्रेलिया या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वाधिक 7 वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडमध्ये झालेल्या 2022 वर्ल्ड कप फायलनमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवत ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यामुळे यंदा ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप ट्रॉफी राखण्यात यशस्वी होणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2205 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर
🚨 BREAKING NEWS 🚨
ICC confirms dates and fixtures for 2025 Women’s Cricket World Cup in India 📝https://t.co/myj2Gfamkv
— ICC (@ICC) June 2, 2025
पाकिस्तानचे सामने कुठे?
टीम इंडिया नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये गेली नव्हती. पाकिस्तान या स्पर्धेच्या यजमान असूनही त्यांना भारतासमोर झुकावं लागलं होतं. त्यानंतर आयसीसी स्पर्धेत दोन्ही संघातील सामने त्रयस्थ ठिकाणी होणार असल्याचं ठरलं होतं. तसेच पाकिस्तानला भारतात नो एन्ट्री आहे. त्यामुळे पाकिस्तान त्यांचे या स्पर्धेतील सर्व सामने हे आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळणार आहे.
