BAN vs NZ : न्यूझीलंडसमोर 237 धावांचं आव्हान, बांगलादेश रोखणार? पाकिस्तानचं लक्ष

ICC Champions Trophy 2025 Bangladesh vs New Zealand 1st Innings Highlights : बांगलादेशने 'करो या मरो' सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी 237 धावांच आव्हान दिलं आहे. कोण जिंकेल सामना?

BAN vs NZ : न्यूझीलंडसमोर 237 धावांचं आव्हान, बांगलादेश रोखणार? पाकिस्तानचं लक्ष
ban vs nz icc champions trophy 2025
Image Credit source: blackaps and icc x account
| Updated on: Feb 24, 2025 | 6:57 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात ए ग्रुपमधील बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. बांगलादेशने या स्पर्धेत विजयी सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडला विजयासाठी 237 धावांचं आव्हान दिलं आहे. बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 236 धावा केल्या. टीम इंडियाने 20 फेब्रुवारीला बांगलादेशचा पराभव करत विजयी सलामी दिली होती. त्यामुळे बांगलादेशसाठी हा सामना करो या मरो असा आहे. तसेच या सामन्याच्या निकालाकडे सलग 2 सामने गमावणाऱ्या पाकिस्तानचंही लक्ष आहे. बांगलादेश हा सामना जिंकला तर पाकिस्तानच्या उपांत्य फेरीतील जर तरच्या आशा कायम राहतील. त्यामुळे आता हा सामना कोण जिंकणार? याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

बांगलादेशच्या टॉप ऑर्डरमधील पहिल्या 3 फलंदाजांना आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र त्या तिघांपैकी कर्णधार नजमूल हुसैन शांतोचा अपवाद वगळता इतर दोघांना मोठी खेळी करता आला नाही. मिडल ऑर्डरने न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. तर अखेरीस शेपटीच्या फलंदाजांनी निर्णायक धावा जोडल्या, त्यामुळे बांगलादेशला न्यूझीलंडसमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलं.

बांगलादेशसाठी नजमूल हुसैन शांतो याने सर्वाधिक धावा केल्या. शांतोने 110 बॉलमध्ये 9 फोरसह 77 रन्स जोडल्या. जाकेर अली 45 धावांवर रनआऊट झाला. रिशाद हौसेन याने 26 आणि ताझिंद हसन याने 24 धावांचं योगदान दिलं. मेहदी हसन मिराज याने 13 तर तास्किन अहमद याने 10 धावा जोडल्या. मात्र या व्यतिरिक्त बांगलादेशच्या एकालाही दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं नाही. न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेल याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. ब्रेसवेल याने त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. ब्रेसवेलने 26 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. विलियम ओरुर्के याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मॅट हेन्री आणि काइल जेमिसन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

सामन्याच्या निकालावर पाकिस्तानचं भवितव्य

टीम इंडियाने 23 फेब्रुवारीला पाकिस्तानला पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला. पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव ठरला. त्यामुळे पाकिस्तान या स्पर्धेतून जवळपास बाहेर झालीय, मात्र शेवटच्या आशा कायम आहेत. बांगलादेशने या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केलं, तर पाकिस्तानच्या आशा कायम राहतील. तसेच बांगलादेशचा पराभव झाला तर टीम इंडिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहचतील. त्यामुळे ए ग्रुपसाठी हा सामना निर्णायक असा ठरणार आहे.

न्यूझीलंडसमोर 237 धावाचं आव्हान

बांगलादेश प्लेइंग इलेव्हन: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, मेहदी हसन मिराज, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, जाकर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, नाहिद राणा आणि मुस्तफिजुर रहमान.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​डेव्हॉन कॉनव्हे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लाथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओरोर्क.