
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सहभागी 8 पैकी 5 संघाचा बाजार उठला आहे. यजमान पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि इंग्लंड या 4 संघांचं साखळी फेरीतच पॅकअप झालं. तर टीम इंडियाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत कॅनबेराचा रस्ता दाखवला. आता दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत.या दोघांमधील विजेता संघ अंतिम फेरीत टीम इंडियाविरुद्ध खेळेल. हा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे रविवारी 9 मार्च रोजी करण्यात आलं आहे. या स्पर्धेदरम्यान 8 पैकी 3 संघांच्या कर्णधारांना मोठा झटका लागला. एकाला कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला. दुसऱ्याची कर्णधारपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. तर तिसऱ्याने पराभवानंतर निवृत्तीच घेतली.
गतविजेता आणि यजमान पाकिस्तानला या स्पर्धेतील साखळी फेरीत एकही सामना जिंकता आला नाही. पाकिस्तनाला 2 सामन्यात पराभूत व्हावं लागंल. तर 1 सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंड दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी नव्या कर्णधाराची घोषणा केली. पीसीबीने मोहम्मद रिझवान याची उचलबांगडी करत सलमान अली आगाह याला कर्णधार केलं. त्यामुळे एका प्रकारे मोहम्मद रिझवानला कर्णधार म्हणून हा मोठा झटका समजला जात आहे.
ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याला दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला मुकावं लागलं. त्यामुळे अनुभवी स्टीव्हन स्मिथ याला कर्णधार करण्यात आलं. कांगारुंनी स्मिथच्या नेतृत्वात उपांत्य फेरीत धडक दिली. मात्र 4 मार्च रोजी टीम इंडियाने कांगारुचा सेमी फायनलमध्ये 4 धुव्वा उडवला. स्टीव्हन स्मिथने या पराभवानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची जाहीर केली. स्मिथने निवृत्ती जाहीर करत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला. स्मिथने एकदिवसीय कारकीर्दीतील 170 सामन्यांमध्ये 5 हजार 800 धावा केल्या. तसेच 28 विकेट्सही घेतल्या.
टीम इंडियाने मायदेशात इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप केलं. इंग्लंडला जोस बटलर याच्या नेतृत्वात हा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर इंग्लंडची चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मोहिमेतील सुरुवात पराभवाने झाली. इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 351 धावा करुनही पराभवाचा सामना करावा लागला. तर त्यानंतर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेनेही इंग्लंडला पराभूत केलं. त्यामुळे इंग्लंडला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही. जोस बटलर याने कर्णधार म्हणून पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला.