
टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत सलग 2 सामने जिंकत उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. तर आता टीम इंडिया साखळी फेरीतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. हा सामना दुबईत खेळवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियातील महत्त्वाच्या सदस्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या सदस्याच्या आईचं निधन झालं आहे. त्यामुळे टीम इंडियातील ही व्यक्ती स्पर्धेदरम्यान मायदेशी परतली आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
टीम इंडियाचे व्यवस्थापक आर देवराज यांच्या आईचं निधन झालं आहे. देवराज हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत. आईच्या निधनामुळे आर देवराज हैदराबादमध्ये परतले आहेत. आता आर देवराज पुन्हा दुबईत जाणार की नाही? याबाबत अनिश्चितता आहे. क्रिकबजच्या रिपोर्ट्सनुसार, आर देवराज हे दुबईला जाणार की नाहीत? याबाबतचा निर्णय हा मंगळवारी 4 मार्च रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यानंतर घेतला जाणार आहे.
“कळवताना दु:ख होत आहे की आमचे सचिव आर देवराज यांच्या मातोश्री कमलेश्वरी गारु यांचे निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. आर देवराज यांच्या कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत”, अशा शब्दात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनकडून शोक व्यक्त करण्यात आला.
दरम्यान काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल काही दिवसांपूर्वी मायदेशी परतला होता. दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मॉर्ने मोर्कल यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे मॉर्ने दक्षिण आफ्रिकेत परतला होता. मात्र त्यानतंर काही दिवसांनी मॉर्ने मोर्कल टीम इंडियासह जोडला गेला. मात्र आता आर देवराज पुन्हा दुबईत येतात की नाही? याकडे लक्ष असणार आहे.
बीसीसीआयकडून प्रत्येक दौऱ्यासाठी व्यवस्थापकाची नियुक्ती केली जाते. व्यवस्थापक हा टीम आणि कोचमधील दुवा असतो. तसेच खेळाडूंना काय हवंय नकोय? हे पाहणंही व्यवस्थापकाची जबाबदारी असते.