ICC T20 Rankings : श्रेयस अय्यरची हनुमान उडी; इशान किशनला फटका, पण… नव्या आयसीसी क्रमवारीत कोण कितव्या स्थानी?

ICC T20 Rankings : आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यरला मोठा फायदा झाला आहे. त्याने 7 स्थानांची झेप घेत 22व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. श्रेयसच्या नावावर 627 रेटिंग गुण आहेत. जपानविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यात तो सामनावीर ठरला होता.

ICC T20 Rankings : श्रेयस अय्यरची हनुमान उडी; इशान किशनला फटका, पण... नव्या आयसीसी क्रमवारीत कोण कितव्या स्थानी?
ICC T20 Rankings
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 23, 2026 | 4:52 PM

आयसीसीने बुधवारी पुरुषांच्या टी20मधील खेळाडूंच्या कामगीरीची क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये आता महत्त्वपूर्ण बदल झालेले पाहायला मिळत आहेत. भारताचा सरपंच कर्णधार श्रेयस अय्यर याने टी20 फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये तब्बल सात स्थांनांची हनुमान उडी घेतली आहे. यासह तो 22 व्या स्थानी पोहोचला आहे. त्याच्या नावावर 627 रेटिंग गुण आहेत. जपानविरुद्ध ऐतिहासिक सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला. यामध्ये श्रेयसच सामनावीर झाला. त्याचप्रमाणे गेल्या मालिकेमध्ये अफगाणिस्तानविरुद्धही चांगली कामगिरी केल्याचा फायदा श्रेयसला झाला आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये त्याने 29 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. तर टीम इंडियाचा विकेटकीपर इशान किशन हा पहिल्या स्थानीच टिकून आहे. जपानविरुद्धच्या सामन्यात केवळ तीन धावा केल्याने त्याचे 9 गुण कमी झाले आहेत आता त्याचे 900 गुण आहेत. तसेच पहिल्याच चेंडूवर बाद झालेला अभिषेक शर्मा हा 893 गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

दरम्यान, ताज्या क्रमवारीमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधले ते इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक याने. एकदिवसीय आणि टी20 सामन्यांच्या फलंदाजी क्रमामध्ये त्याने प्रगती साधली आहे. नुकताच इंग्लंडने लंकेला तीन सामन्यांच्या टी20 मालिकेमध्ये क्लीन स्वीप दिला होता. त्यानंतर पहिला एकदिवसीय सामना 89 धावांनी जिंकला होता. 237 धावा केल्याबद्दल ब्रुकला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले होते. त्यामुळे आता तो टी20 मध्ये पाच स्थानांनी वर चढून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. ब्रुकने त्याच्या कारकीर्दीतील सर्वात उत्तम रेटिंगही प्राप्त केले आहे, जे की 793 आहे. दुसरीकडे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 67 धावा करणाऱ्या ब्रुकने एकदिवसीय फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये तीन स्थानांची उडी घेत 12वे स्थान मिळवले आहे. तर जोस बटलर हा टी20 क्रमवारीमध्ये दोन स्थानांनी वर चढून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

दरम्यान, जेमी ओव्हरटनने टी20 मालिकेमध्ये उत्तम कामगिरी केल्यामुळे गोलंदाजी क्रमवारीमध्ये 47 स्थानांची झेप घेतली आहे. तो आता टॉप 10 खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. तो आता सहाव्या क्रमांकावर असून 674 गुणांसह त्याने कारकीर्दीतील सर्वोत्तम गुण प्राप्त केले आहेत. ऑस्ट्रेलियाचा जोश इंग्लिस फलंदाजी क्रमवारीमध्ये 11 स्थानांनी वर चढून 30व्या स्थानी पोहोचला आहे. इंग्लिसने शेवटच्या एकदिवसीय सामन्यामध्ये त्याने शानदार शतक झळकावले होते. ज्याचा त्याला मोठा फायदा झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us