
क्रिकेट चाहत्यांना गेल्या काही दिवसांपासून टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या वेळापत्रकाचे वेध लागले होते. वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? याची उत्सूकता चाहत्यांना होती. चाहत्यांची ही प्रतिक्षा अखेर संपली.आयसीसीने 25 नोव्हेंबरला स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. भारतात आणि श्रीलंकेत या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारतात 2016 आणि श्रीलंकेत 2012 नंतर टी 20I वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 8 मार्चला अंतिम सामना होणार आहे.
या स्पर्धेत एकूण 55 सामने होणार आहेत. दहाव्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतही 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघांची 5-5 नुसार 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. आयसीसीने ए ग्रुपमध्ये गतविजेता टीम इंडियाला ठेवलं आहे. तसेच टीम इंडिया व्यतिरिक्त या ग्रुपमध्ये यूएसए, पाकिस्तान नामिबिया आणि नेदरलँड्सचा समावेश आहे.
ए ग्रुपमध्ये पाकिस्तानचा अपवाद वगळता इतर 3 संघ तुलनेत नवखे आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा सुपर 8 चा मार्ग मोकळा असल्याचं निश्चित समजलं जात आहे. मात्र उर्वरित एका जागेसाठी पाकिस्तान आणि यूएसएमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार असल्याचं आतापासूनच म्हटलं जात आहे. त्याचं कारणही तसंच आहे.
आयसीसीने गेल्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतही भारत, पाकिस्तान आणि यूएसएला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं होतं. तेव्हा पाकिस्तानचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं होतं. विशेष म्हणजे तुलनेत नवख्या यूएसए संघाने पाकिस्तानपेक्षा सरस कामगिरी केली होती. पाकिस्तान आणि यूएसएने 4 पैकी 2 सामने जिंकले होते. तसेच यूएसएने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. उभयसंघातील सामना हा बरोबरीत सुटला होता. त्यानंतर यूएसएने पाकिस्तानवर सुपर ओव्हरमध्ये मात केली होती. त्यामुळे यूएसए यंदाही तशीच कामगिरी करणार की पाकिस्तान गेल्या पराभवाची परतफेड करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. पाकिस्तान-यूएसए यांच्यातील सामना हा 10 फेब्रुवारीला होणार आहे.
दरम्यान प्रत्येक संघाचे साखळी फेरीत 4 सामने होणार आहेत. प्रत्येक गटातून अव्वल 2 संघ सुपर 8 साठी पात्र ठरणार आहेत. भारत आणि यूएसए हे दोन्ही संघ या मोहिमेतील आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना 7 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.