
आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील नवव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 107 धावांनी धुव्वा उडवला आहे. ऑस्ट्रेलियाने बेथ मुनीच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानसमोर 222 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानला हे आव्हानही पेलता आलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 36.3 ओव्हरमध्ये 114 रन्समध्ये गुंडाळलं. ऑस्ट्रेलियाने यासह वर्ल्ड कप स्पर्धेतील आपला दुसरा विजय मिळवला. तर पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव ठरला.
पाकिस्तानसाठी सिद्रा आमीन हीने सर्वाधिक धावा केल्या. सिद्रा आमीनने 52 बॉलमध्ये 5 फोरसह 35 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकीलाही 20 पार मजल मारता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या 5 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठून दिला नाही. तर इतरांनाही झटपट गुंडाळून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आणि सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. या सर्व गोलंदाजांनी विकेट मिळवल्या.
ऑस्ट्रेलियासाठी किम गर्थ हीने 6 बॉलमध्ये 14 रन्सच्या मोबदल्यात तिघांना आऊट केलं. मेगन शट आणि अन्नाबेल सदरलँड या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर अलाना किंग, एश्ले गार्डनर आणि जॉर्जिया वॉरहम या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
त्याआधी पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. पाकिस्तानने बॉलिंगचा निर्णय घेतला. कॅप्टन फातिमा सना हीचा निर्णय पाकिस्तानच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला झटपट झटके दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 33.5 ओव्हरमध्ये 8 आऊट 115 अशी झाली.
त्यांनतर बेथ मुनी आणि अलाना किंग या जोडीने गेम फिरवला. मुनी आण किंग या जोडीने चक्क नवव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आणि इतिहास घडवला. मुनी आणि किंग महिला क्रिकेटमध्ये नवव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करणारी पहिली जोडी ठरली. या जोडीने नवव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दरम्यान अलाना किंग हीने अर्धशतक आणि बेथ मुनीने शतक झळकावलं.
मुनी आणि किंगने नवव्या विकेटसाठी 106 रन्सची पार्टनरशीप केली. मुनी डावातील शेवटच्या बॉलवर आऊट झाली. ऑस्ट्रेलियाने अशाप्रकारे 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 221 धावा केल्या. मुनीने 109 रन्स केल्या. तर अलानाने नाबाद 51 धावा केल्या. पाकिस्तानसाठी नश्रा संधूने तिघांना बाद केलं. फातिमा सना आणि रमीन शमीम दोघींनी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर डायना बेग आणि सादिया इक्बाल यांना 1-1 विकेट मिळाली.
दरम्यान पाकिस्तानचा हा सलग तिसरा ठरवला. पाकिस्तानला याआधी बांगलादेश आणि टीम इंडियाने पराभूत केलं होतं. पाकिस्तानची सलग तिसऱ्या पराभवामुळे पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटची अर्थात आठव्या स्थानी घसरण झाली आहे.