
आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत टीम इंडिया आपल्या मोहिमेतील चौथा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियासमोर स्पर्धेतील 13 व्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. उभयसंघातील हा सामना रविवारी 12 ऑक्टोबरला विशाखापट्टणममधील डॉ वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाला गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे भारतासमोर आता गतविजेत्या संघाला पराभूत करुन विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया सलग तिसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
भारतीय महिला संघाने स्पर्धेतील आपली सुरुवात दणक्यात केली. भारताने श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करत सलग 2 सामने जिंकले. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारतावर मात करत यजमान संघाला विजयी हॅटट्रिक करण्यापासून रोखलं. त्यामुळे भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाचा कसा सामना करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.
तर दुसर्या बाजूला गतविजेत्या ऑस्ट्रेलियानेही टीम इंडियाप्रमाणेच स्पर्धेतील सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड आणि पाकिस्तानला पराभूत करत सलग 2 सामने जिंकले. मात्र श्रीलंकेविरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया टीम इंडिया विरुद्ध विजयी हॅटट्रिकसाठी भिडणार आहे.
दरम्यान आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एकूण 13 वेळा आमनेसामने आले आहेत. आकडेवारी पाहता ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने या 13 पैकी सर्वाधिक 10 वेळा विजय मिळवला आहे.
तसेच भारताला फक्त 3 सामन्यांमध्येच विजयी होता आलं आहे. यात 2017 वर्ल्ड कप सेमी फायनलमधील विजयाचा समावेश आहे. मात्र भारतीय महिला ब्रिगेडला 2017 नंतर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे टीम इंडिया गेल्या 8 वर्षांची प्रतिक्षा संपवत ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा विजय साकारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या सामन्यात टॉस फॅक्टरही महत्त्वाचा ठरणार आहे.