AUS vs IND Semi Final : भारत-ऑस्ट्रेलिया सेमी फायनलवर पावसाचं सावट? गुरुवारी हवामान कसं असणार? जाणून घ्या

Aus vs Ind Womens Semi Final Weather Forecast : भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर उपांत्य फेरीतील सामनाही याच मैदानात होणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे.

AUS vs IND Semi Final : भारत-ऑस्ट्रेलिया सेमी फायनलवर पावसाचं सावट? गुरुवारी हवामान कसं असणार? जाणून घ्या
Aus vs Ind Womens Semi Final Weather Forecast
Image Credit source: Bcci
| Updated on: Oct 30, 2025 | 12:08 AM

दक्षिण आफ्रिकेने बुधवारी 29 ऑक्टोबरला इंग्लंडचा धुव्वा उडवत आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक दिली. आता उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात यजमान विरुद्ध गतविजेता अशी थेट लढत होणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हा सामना गुरुवारी 30 ऑक्टोबरला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील अनेक सामने हे पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यात पावसाने विघ्न घालू नये, अशी इच्छा क्रिकेट प्रेमींची आहे. आता गुरुवारी पावसाचा किती अंदाज आहे? हे जाणून घेऊयात.

उपांत्य फेरीतील सामना निकाली निघावा यासाठी खबरदारी म्हणून राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र राखीव दिवशीही पावसाची अधिक शक्यता आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना हा याच मैदानात खेळवण्यात आला होता. हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. पावसाने खेळ बिघडवला तर भारताला सेमी फायनल न खेळताच स्पर्धेतून बाहेर व्हावं लागू शकतं. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची धाकधुक आणखी वाढली आहे.

पावसाची किती शक्यता?

एक्युवेदरनुसार, गुरुवारी सामन्याच्या दिवशी पाऊस बरसू शकतो. टॉस दरम्यान दुपारी अडीचच्या आसपास पाऊस होण्याची 20 ते 25 टक्के शक्यता आहे. तसेच संपूर्ण सामन्यादरम्यान रिमझिम पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या सामन्यात पाऊस विघ्न घालणार हे अंदाजावरुन निश्चित समजलं जात आहे.

राखीव दिवस केव्हा?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीतील सामन्यासाठी 31 ऑक्टोबर हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. उपांत्य फेरीतील मुख्य दिवशी अर्थात 29 ऑक्टोबरला सामना कोणत्याही कारणामुळे पूर्ण न झाल्यास 31 ऑक्टोबरला उर्वरित खेळ होईल. मात्र 31 ऑक्टोबरला पावसाची शक्यता 80 टक्के आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबरलाही सामना निकाली निघण्याबाबत दाट शंका आहे.

सामन्याबाबत थोडक्यात पण महत्त्वाचं

दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर मोबाईलवर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.