Pakistan Women : पाकिस्तानच्या विजयाची पाटी कोरीच, रिकाम्या हाताने घरी, अशी राहिली कामगिरी

Sri Lanka Women vs Pakistan Women Match Result : पाकिस्तान वूमन्स क्रिकेट टीमला आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत एकही सामन्यात विजयी होता आलं नाही. पाकिस्तानची या स्पर्धेतील कामगिरी कशी राहिली ते जाणून घ्या.

Pakistan Women : पाकिस्तानच्या विजयाची पाटी कोरीच, रिकाम्या हाताने घरी, अशी राहिली कामगिरी
Pakistan Women Cricket Team
Image Credit source: Sameera Peiris/Getty Images
| Updated on: Oct 24, 2025 | 10:30 PM

पाकिस्तान क्रिकेट टीमला काही महिन्यांआधी झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही. गतविजेता असलेल्या पाकिस्तान मेन्स टीमच्या विजयाची पाटी कारोच राहिली होती. तसंच आता वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान वूमन्स टीमसोबत झालंय. पाकिस्तानच्या महिला संघाला या स्पर्धेत विजयाचं खात उघडता आलं नाही. पाकिस्तानने या स्पर्धेत एकूण 7 सामने खेळले. त्यापैकी काही सामने पावसामुळे वाया गेले. तर काही सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत व्हावं लागलं. पाकिस्तानचं या स्पर्धेत साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं.

श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द

वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 25 व्या सामन्यात यजमान श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने होते. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. पाकिस्तानला हा सामना जिंकून मोहिमेचा शेवट विजयाने करण्याची संधी होती. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात आला. पाकिस्तानचा हा या स्पर्धेतील पावसामुळे रद्द झालेला हा एकूण तिसरा सामना ठरला. तसेच यासह पाकिस्तान या स्पर्धेतील सर्वात अपयशी टीम ठरली. पाकिस्तानला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही.

पाकिस्तान वूमन्सची स्पर्धेतील कामगिरी

पाकिस्तानचा या स्पर्धेतील 4 सामन्यांमध्ये पराभव झाला. तर 3 सामने हे पावसामुळे वाया गेले. पाकिस्तानने अशाप्रकारे एकूण 3 गुण मिळवले आणि पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून दुसरं अर्थात सातवं स्थान मिळवलंय.

सुरुवात आणि शेवट

पाकिस्तानची मोहिमेतील सुरुवातच पराभवाने झाली. बांगलादेशने 2 ऑक्टोबरला पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर 5 ऑक्टोबरला दुसऱ्या सामन्यात 88 धावांनी मात केली. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने 8 ऑक्टोबरला पाकिस्तानची लाज काढली. पाकिस्तानला 107 धावांनी पराभूत केलं.

त्यानंतर पाकिस्तानचे सलग 2 सामने पावसामुळे वाया गेले. इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्धचे सामने पावसामुळे रद्द करावे लागले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने तब्बल 150 धावांनी धुळ चारली. तर सर्वात शेवटचा श्रीलंकेविरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला.

उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित, जाणून घ्या

दरम्यान वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया या 4 संघांनी उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं आहे.