
टीम इंडियाने धर्मशालेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी 20I सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंगने अप्रतिम कामगिरी केली. भारताने दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताने या विजयासह दुसर्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली. तसेच 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. भारताने यासह मालिका विजयाचा दावा आणखी मजबूत केला आहे. मात्र त्यानंतरही कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुबमन गिल या दोघांच्या कामगिरीबाबतची चर्चा कायम आहे. शुबमन आणि सूर्या हे दोघेही सातत्याने मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहे. आगामी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. अशात सूर्याने तिसऱ्या सामन्यानंतर स्वत:च्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया दिली.
रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव याला टी 20I कॅप्टन्सी देण्यात आली. तेव्हापासून टीम इंडियाने सूर्याच्या नेतृत्वात एकही मालिका गमावलेली नाही. सूर्याने कॅप्टन म्हणून दमदार कामगिरी केलीय. मात्र फलंदाज म्हणून सूर्याच्या कामगिरीत सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. सूर्याने या मालिकेत आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये एकूण 29 धावा केल्या आहेत. सूर्याला त्याच्या कामगिरीवरुन प्रश्न करण्यात आला. यावर सूर्याने काय प्रतिक्रिया दिली? जाणून घेऊयात.
“मी नेटमध्ये चांगली बॅटिंग करतोय. मी माझ्या क्षमतेनुसार शक्य तितके प्रयत्न करतोय. तसेच सामना येईल तेव्हा, धावा कराव्या लागतील तेव्हा त्या होतील. मात्र मी धावा करण्याचा प्रयत्न करतोय, मी आऊट ऑफ फॉर्म नाही, मात्र मी धावा करण्यात सातत्याने अपयशी ठरतोय”, असं सूर्याने स्वत:च्या कामगिरीबाबत म्हटलं.
“आम्ही या विजयाचा आनंद घेऊ. आज रात्री विजयाचा जल्लोष करु. आम्ही उद्या लखनौला पोहचून चर्चा करु. त्यानंतर या सामन्यात काय झालं यावर चर्चा करु”, असंही सूर्याने सांगितलं.
“हा खेळ आपल्याला खूप काही शिकवतो असं मला वाटतं. मालिकेत कमबॅक करणं जास्त महत्त्वाचं असतं आणि आम्ही पण तसंच केलं”, अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादव याने कमबॅकबाबत दिली. टीम इंडियाला दुसऱ्या टी 20I सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं.