Retirement | वर्ल्ड कपनंतर स्टार खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर
Cricket Retirement | क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडूने तडकाफडकी थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. खेळाडूने याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची 19 नोव्हेंबर रोजी सांगता झाली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर मात करत सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. तर टीम इंडियाचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कप जिंकण्याचं दुसऱ्यांदा स्वप्न भंग झालं. टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकून अफलातून कामगिरी केली होती. मात्र टीम इंडियाने एका सामन्यासह वर्ल्ड कपही गमावला. अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि इतर खेळाडू हे नाराज झालेले पाहायला मिळाले. या वर्ल्ड कपमधील पराभवानंतर विराट आणि रोहितच्या निवृत्तीची चर्चा जोरदार रंगली आहे. अशातच शेजारील देशातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
पाकिस्तानचा ऑलराउंडर खेळाडू इमाद वसीम याने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटरला अलविदा केला आहे. इमादने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती क्रिकेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. इमादने निवृत्तीच्या निर्णय जाहीर करताना भलीमोठी पोस्ट लिहीली आहे. इमादने यामध्ये मार्गदर्शक, सहकारी आणि क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच पीसीबीने इमादची पोस्ट रिशेअर करत त्याने पाकिस्तान क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानासाठी आभार मानलेत. तसेच पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इमादला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
इमाद वसीम काय म्हणाला?
“नुकतंच मी माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीबाबत विचार केला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीने इतके वर्ष सहकार्य केलं त्यासाठी मी आभारी आहे. मला पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करायला मिळालं ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. वनडे आणि टी 20 मधील 121 सामन्यांमधील प्रत्येक खेळी ही माझी स्वप्नपूर्ती होती. पाकिस्तान क्रिकेटसाठी नवे कोच आणि कॅप्टनसह भविष्यातील वाटचालीसाठी ही योग्य वेळ आहे. टीमने चांगली कामगिरी करावी यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.”, असं इमादने म्हटलं.
इमादचा क्रिकेटला टाटा बाय बाय
Thank you @simadwasim for your services to Pakistan cricket over the years. Wishing you all the best for your future endeavours 🙌 https://t.co/lFlkpOvnxU pic.twitter.com/5rjAX7bIVS
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 24, 2023
इमादची क्रिकेट कारकीर्द
इमादने 19 जुलै 2015 रोजी श्रीलंका विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं. तर 24 मे 2015 मध्ये झिंबाब्वे विरुद्ध टी 20 डेब्यू केलं.इमादने पाकिस्तानचं 55 एकदिवसीय आणि 66 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. इमादने वनडेमध्ये 5 अर्धशतकांसह 986 धावा आणि 44 विकेट्स घेतल्या. तर टी 20 मध्ये 1 अर्धशतकासह 486 रन्स आणि 65 विकेट्स घेतल्या.
