AUS vs IND : रोहित-विराट जोडीचा धमाका, टीम इंडियाचा अंतिम सामन्यात दणदणीत विजय, कांगारुंचा 9 विकेट्सने धुव्वा

Virat Kohli and Rohit Sharma IND vs AUS 3rd Odi Match Result : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 237 धावांचं आव्हान दिलं होतं. रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने हे आव्हान सहज पूर्ण केलं.

AUS vs IND : रोहित-विराट जोडीचा धमाका, टीम इंडियाचा अंतिम सामन्यात दणदणीत विजय, कांगारुंचा 9 विकेट्सने धुव्वा
Rohit Sharma and Virat Kohli IND vs AUS 3rd Odi
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Oct 25, 2025 | 4:26 PM

रोहित शर्मा-विराट कोहली या अनुभवी तसेच माजी कर्णधारांच्या जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात नाबाद दीडशतकी भागीदारी करत टीम इंडियाला 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवून दिला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये विजयासाठी 237 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 38.3 ओव्हरमध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. भारताने या विजयासह ऑस्ट्रेलियाला 3-0 ने मालिका जिंकण्यापासून रोखलं. भारताने ही मालिका 1-2 ने गमावली. मात्र रोहित आणि विराट या दोघांनी केलेल्या भागीदारीने चाहत्यांची मनं जिंकली.

टीम इंडियाची कडक सुरुवात

रोहित आणि कॅप्टन शुबमन गिल या सलामी जोडीने भारताला अप्रतिम सुरुवात करुन दिली. दोघांनी 69 धावा जोडल्या. त्यानंतर शुबमन 24 धावांवर आऊट झाला. शुबमननंतर विराट कोहली मैदानात आला. विराट गेल्या 2 सामन्यांमध्ये सलग शून्यावर बाद झाला होता. मात्र विराटने सिडनीत पहिलीच धाव घेत सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर विराटनेही रोहितसह मैदानात घट्ट पाय रोवले. या जोडीने अखेरपर्यंत नाबाद राहत भारताला एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विजयी केलं.

दुसऱ्या विकेटसाठी 168 धावांची नाबाद भागीदारी

रोहित आणि विराट या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 169 बॉलमध्ये 168 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. रोहितने या दरम्यान कारकीर्दीतील 33 वं शतक पूर्ण केलं. रोहितने 125 चेंडूत 96.80 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 121 धावा केल्या. रोहितने या खेळीत 13 चौकार आणि 3 षटकार लगावले. तर विराटने 81 बॉलमध्ये नॉट आऊट 74 रन्स केल्या. विराटने या दरम्यान 7 चौकार लगावले. तर ऑस्ट्रेलियासाठी जोश हेझलवूड याने एकमेव विकेट मिळवली.

टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल

त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची ज्या पद्धतीने सुरुवात झाली ते पाहता 300 धावा सहज होतील असं चित्र होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी खरंच कमाल केली. भारताने गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 53 धावांच्या मोबदल्यात शेवटच्या 7 विकेट्स मिळवल्या. भारताने यासह ऑस्ट्रेलियाला 46.4 ओव्हरमध्ये 236 रन्सवर ऑलआऊट केलं.

भारताचा चाबूक विजय

ऑस्ट्रेलियासाठी मॅथ्यू रेनशॉ याने सर्वाधिक 56 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त टॉपमधील 5 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र भारतीय गोलंदाजांनी मॅथ्यू व्यतिरिक्त एकालाही मोठी खेळी करुन दिली नाही. कॅप्टन मिचेल मार्श याने 41 धावा कल्या. मॅथ्यू शॉर्ट याने 30 धावांचं योगदान दिलं. तर त्याव्यतिरिक्त एकालाही 30 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. टीम इंडियासाठी हर्षित राणा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर याने दोघांना बाहेर पाठवलं. तर अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.