
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरु आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. डावखुऱ्या गोलंदाजांना आऊट होतो असा ठपका त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून लागला होता. ऑस्ट्रेलियानेही मिचेल स्टार्क घेत असंच काहीसं दाखवलं होतं. पण रोहित शर्माने आतापर्यंतचा सर्वच राग त्याने चौकार आणि षटकार मारून काढला. इतकंच काय तर वर्ल्डकपमधील वेगवान अर्धशतक झळकावून एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने 19 चेंडूत अर्धशतक झळकावलं. या खेळीत 5 षटकार आणि 4 चौकार मारले. त्याने 263.16 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकलं. यापूर्वी अमेरिकेच्या आरोन जोन्सने कॅनडाविरुदध 22 चेंडूत अर्धशतक झलकावलं होतं. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकने इंग्लंडविरुद्ध 22 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोयनिसने स्कॉटलँडविरुद्ध 25 चेंडूत अर्धशतक, तर वेस्ट इंडिजच्या शाई होपने अमेरिकेविरुद्ध 26 चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती.
रोहित शर्मा भारताकडून टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 2007 मध्ये युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. 2021 मध्ये केएल राहुलने स्कॉटलँडविरुद्ध 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. आता रोहित शर्माने 19 चेडूंत अर्धशतक झळकावले आहेत. 2007 मध्ये युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 चेंडूत, तर 2022 मध्ये सूर्यकुमार यादवने झिम्बाब्वेविरुद्ध 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. दुसरीकडे, रोहित शर्माने आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दित षटकारांचं द्वीशतकही पूर्ण केलं आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.