IND vs ENG: हॅरी ब्रूक आणि बटरलचा झंझावात, शतकी खेळी आणि विक्रमासह भारतीय गोलंदाजांची धुलाई
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यातही भारताची स्थिती नाजूक आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा डावही उलटाच पडला. जोस बटलर आणि हॅरी ब्रूक यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली.

पाचव्या टी20 सामन्यातही इंग्लंडचा संघ भारतावर भारी पडला आहे. सलग पाच सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकलेल्या श्रेयस अय्यरच्या संघाला या सामन्यातही विजय कठीण जाणार आहे. कारण कर्णधार हॅरी ब्रूक आणि जोस बटलर यांनी भारतीय गोलंदाजांची पिसं काढली. भारतीय गोलंदाजांना कोणतीच दया माया दाखवली नाही. इंग्लंडची पहिली विकेट अवघ्या 8 धावांवर पडली होती. मात्र त्यानंतर दुसरी विकेट घेताना भारतीय गोलंदाजांचा घाम निघाला. पावर प्लेमध्ये 1 विकेट पडल्यानंतरही इंग्लंडने 10 च्या सरासरीने 61 धावा केल्या. त्यानंतर या दोघांनी आक्रमक बाणा स्वीकारला आणि तोडफोड सुरू केली. समोर येईल त्या गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. त्यामुळे भारतीय गोलंदाज पुरते हतबल झाल्याचं दिसून आले. कुठे चेंडू टाकावा हेच त्यांना कळेना. इंग्लंडने 20 षटकात 3 गडी गमवून 257 धावा केल्या आणि विजयासाठी 258 धावांचं आव्हान दिलं आहे.
जोस बटलरचं शतक आणि विक्रमी भागीदारी
जोस बटलर आणि हॅरी ब्रूक यांनी दुसऱ्या विकेटसाठी 102 चेंडूत 233 धावांची भागीदारी केली. भारताविरुद्ध टी20 मधील विक्रमी भागीदारी ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम क्विंटन डी कॉक आणि डेविड मिलरच्या नावावर होता. त्याने नाबाद 174 धावांची भागीदारी केली होती. तसेच इंग्लंडकडून सर्वाधिक भागीदारी करणारी जोडी ठरली आहे. यापूर्वी मलान आणि मॉर्गन यांनी 2019 मध्ये 182 धावांची भागीदारी केली होती. बटरल-ब्रूक यांच्या 233 धावांच्या भागीदारी जोस बटलरने 64 चेंडूत 12 चौकार आणि 8 षटकार मारत 131 धावा केल्या. त्याने 204.69 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
दुसरीकडे, हॅरी ब्रूकने भारताविरुद्ध अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यासह भारताविरुद्ध वेगवान अर्धशतक ठोकणारा चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी मार्को जानसेनने 2024 मध्ये सेंच्युरियनवर 16 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. तर कॅमरून ग्रीन, जेकब बेथेल आणि हॅरी ब्रूकने 19 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. हॅरी ब्रूकचं शतक अवघ्या 5 धावांनी हुकलं. त्याने 45 चेंडूत 8 षटकार आणि 4 चौकार मारत नाबाद 95 धावा केल्या.
भारतीय गोलंदाजांची नाजूक स्थिती
भारताकडून प्रिन्स यादव आणि अक्षर पटेल यांनी सर्वात महागडा स्पेल टाकला. प्रिन्स यादवने 4 षटकात 60 धावा दिल्या. तसेच अक्षर पटेलने 4 षटकात 63 धावा दिल्या. तसेच एकही विकेट मिळाली नाही. सूर्यांश शेडगेने 3 षटकात 39 धावा दिल्या. तर शिवम दुबेने 1 षटक टाकलं पण 22 धावा देत 2 गडी बाद केले. अर्शदीप सिंगने 4 षटकात 33 धावा आणि प्रसिद्ध कृष्णाने 4 षटकात 1 गडी बाद करत 38 धावा दिल्या.