IND vs ENG : इंग्लंडच्या सातव्या विकेटने टीम इंडियाला रडवलं, विजयासाठी मिळालं 259 धावांचं आव्हान
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यावर भारताची पकड मजबूत होताना दिसत होती. पण इंग्लंडच्या सातव्या विकेटने झुंजवलं. त्यामुळे भारताला विजयासाठी धावांचं आव्हान दिलं.

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने 47.5 षटकात सर्व गडी गमवून 258 धावा केल्या. यासह भारतासमोर विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं. खरं तर इतक्या धावांपर्यंत इंग्लंडचा संघ पोहोचेल असं वाटलं नव्हतं. कारण अवघ्या 107 धावांवर इंग्लंडने 6 गडी गमावले होते. त्यामुळे फार फार तर 150 ते 180 धावा होतील असं वाटलं होतं. पण जो रूट आणि आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लियाम डावसन यांनी भारतीय गोलंदाजांना रडवलं. सातव्या विकेटसाठी या दोघांनी 100हून अधिक धावांची भागीदारी केली आणि इंग्लंड संघाला सुस्थितीत आणलं. आता भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे. विजयी धावा गाठताना भारतीय फलंदाजी कशी कामगिरी करतात याकडे लक्ष असणार आहे.
इंग्लंडचा डाव
इंग्लंडकडून बेन डकेट आणि जेकब बेथेल ही जोडी सलामीला आली होती. या जोडीने इंग्लंडला चांगली सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 61 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी फुटली आणि इंग्लंडचा डाव गडगडला. जेकब बेथेल 14 धावा करून बाद झाला. त्यानंतर लगेचच बेन डकेटची विकेट पडली. 45 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. त्यानंतर धडाधड आणखी चार विकेट पडल्या. हॅरी ब्रूक 1 धाव करून जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. जोस बटलरला 5 धावा करता आल्या. तर सॅम करनला खातंही खोलता आलं नाही. विल जॅक्सही फार काळ मैदानात टिकला नाही आणि 20 धावा करून तंबूत परतला.
इंग्लंडकडून सातव्या विकेटसाठी जो रूट आणि लियाम डावसन यांनी 121 धावांची भागीदारी केली. लियाम डावसनने 83 चेंडूत 68 धावांची खेळी केली. त्याची विकेट काढण्यात अक्षर पटेलला यश आलं. पण तिथपर्यंत इंग्लंडने 200 धावांचा पल्ला ओलांडला होता. त्यानंतर जोफ्रा आर्चरने जो रूटला साथ दिली. आठव्या विकेटसाठी 22 धावांची भागीदारी केली. जोफ्रा 12 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला आदिल राशीद 1 धाव करून परतला. तर जोश टंगला खातंही खोलता आलं नाही. जो रूटना 76 चेंडूत 76 धावा करून नाबाद ऱाहिला.