
मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांची मालिका आता इंग्लिश संघाने खिशात घातली आहे. चौथा कसोटी सामनाही टीम इंडियाने पाच विकेटने जिंकत इंग्लंडला पराभूत केलं आहे. युवा खेळाडूंनी केलेली कामगिरी या सामन्यात पाहण्यासारखी होती. पदार्पणवीर वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि दुसरा कसोटी सामना खेळणारा ध्रुव जुरेल यांची मॅचविनिंग खेळी सामना पालटवणारी ठरली. कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने इंग्लंड संघाला पराभवाची धूळ चारली. मात्र रोहित आता वेगळ्याचं कारणाने चर्चेत आला आहे. रोहित शर्मा याने केलेल्या वक्तव्याची दिल्ली पोलिसांनी दखल घेतली आहे. नेमकं काय कारण जाणून घ्या.
चौथ्या कसोटी सामन्यामध्ये रोहित शर्मा याने सर्फाराज खान याला चालू सामन्यात झापलं होतं. रोहितने मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याला झापलेलं पाहायला मिळालं होतं. कुलदीप यादव गोलंदाजी करत असताना इंग्लंडच्या फलंदाजाजवळच सर्फराज उभा होता. त्यावेळी त्याने हेल्मेट घातलं नव्हतं, तेव्हा रोहितने त्याला, भावा आपल्याला हिरो नाही व्हायचं, हेल्मेट घाल, असं म्हणत झापलं होतं.
रोहितने एक कर्णधार म्हणून त्याची जबाबदारी पार पाडली. जवळ फिल्डिंगला थांबलं आणि चेंडू डोक्याला लागला तर जीवावर बेतू शकतं. त्यामुळे रोहितने सामना थांबवत हेल्मेट घालायला लावलं. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडीओ शअर करत, टू- व्हीलर चालवताना हेल्मेट घालायचं, हिरो नाही बनायचं असं कॅप्शन दिलं आहे.
Two-wheeler par hero nahi banne ka!
Hamesha helmet pehenne ka!#INDvENG#INDvsENG#RohitSharma#RoadSafety pic.twitter.com/NsXB80tF56
— Delhi Police (@DelhiPolice) February 25, 2024
रोहित शर्माच्या व्हायरल व्हिडीओचा वापर करत दिल्ली पोलिसांनी सर्व टू-व्हीलर चालकांन हेल्मेट वापरण्याचा संदेश दिला. दिल्ली पोलिसांनी एक्स (ट्विट) करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हे ट्विट जोरदार व्हायरल होत असलेलं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, टीम इंडियाने चौथा सामना जिंकत कसोटी मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. पाचवा कसोटी सामना जिंकत इंग्लंड संघाला घरी पाठवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. पाचव्या सामन्यात संघात काही बदल केले जावू शकतात. रजत पाटीदार हा मधल्या फळीमध्ये अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे त्याच्या जागी संघात कोणाली संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.