इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने दिले असे संकेत, म्हणाला… Video

भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांची टी20 मालिका बुधवारपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाने कसून सराव केला. तसेच सूर्यकुमार यादवच्या वक्तव्याने उत्सुकता ताणली गेली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने दिले असे संकेत, म्हणाला... Video
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 21, 2025 | 4:20 PM

भारतीय संघ मोठ्या कालावधीनंतर टी20 मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिलाच सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. या सामन्यापूर्वीच सूर्यकुमार यादवने शंख फुंकला आहे. इतकंच काय तर त्याचं वक्तव्य पाहता या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडेल असंच दिसत आहे. मौसम अच्छा है, इसलिए हवाई फायर दोनों टीमों की ओर से होंगे, असं वक्तव्य सूर्यकुमार यादवने सामन्यापूर्वी केलं आहे. त्यामुळे इंग्लंड या मालिकेत कसं खेळेल हे काही माहिती नाही. पण टीम इंडियाच्या कर्णधाराचं वक्तव्य पाहता या मालिकेत वादळी खेळीची अनुभूती होणार यात काही शंका नाही. कर्णधारपद स्वीकारल्यानंतर सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच ईडन गार्डन्स मैदानात टी20 सामना खेळताना दिसणार आहे.

बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी अधिकृत एक्स अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात सूर्यकुमार यादव सर्व काही बोलला आहे. त्याने हवाई फायरमध्ये या सामन्यात चौकार आणि षटकारांचा वर्षाव होईल असं सांगितलं आहे. दोन्ही बाजूने हे पाहायला मिळेल असं त्याने स्पष्टपणे सांगितलं. सूर्यकुमार यादवने या व्हिडीओत आणखी एक बाब अधोरेखित केली की, कोलकात्यात खेळणं माझ्यासाठी कायम वेगळी अनुभूती राहिली आहे. या मैदानात पहिल्यादा 2014-15 मध्ये खेळलो होतो. गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकात्याकडून खेळताना या मैदानावर खूप काही शिकलो आहे. पण टीम इंडियाचा कर्णधार म्हणून पहिल्यांदाच खेळत आहे. या गोष्टीचा सर्वात जास्त आनंद आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेची खऱ्या अर्थाने तयारी सुरु झाली असंच म्हणावं लागेल. कारण पुढच्या वर्षी म्हणजेच 2026 जून महिन्यात भारतात टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाची धुरा सूर्यकुमार यादवच्या हाती असणार आहे. त्यामुळे आतापासून टीमची बांधणी करणं आवश्यक आहे. त्यानुसार यापुढे होणाऱ्या सर्व टी20 मालिका भारतासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. कारण आता दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यानंतर नव्या खेळाडूंना त्यासाठी तयार करणं तितकंच आवश्यक आहे.