IND vs NAM : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, नामिबियाचा 93 धावांनी धुव्वा

Icc T20i World Cup 2026, India vs Namibia Match Result : भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात नामिबियाला पराभूत करुन आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे.

IND vs NAM : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, नामिबियाचा 93 धावांनी धुव्वा
Hardik Pandya and Jasprit Bumrah against Namibia
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Feb 12, 2026 | 11:12 PM

टीम इंडियाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने नामिबियाचा 93 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने नामबियासमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर नामिबायाला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने नामिबियाला 10 बॉलआधी ऑलआऊट केलं. भारताने नामिबियाला 18.2 ओव्हरमध्ये 116 रन्सवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे यूएसएनंतर आता नामिबियाचा धुव्वा उडवून सलग दुसरा विजय साकारला आहे. तसेच टीम इंडियाचा नामिबिया विरुद्धचा हा टी 20I क्रिकेटमधील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला.

भारताचा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय

टीम इंडियाने नामिबियावर एकतर्फी फरकाने मात करत ऐतिहासिक कामगिरी केली. भारताचा टी 20i वर्ल्ड कप इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला. भारताचं या कामगिरीसाठी सोशल मीडियावरुन अभिनंदन केलं जात आहे.

सामन्यात काय झालं?

नामिबियाने नाणेफेक जिंकून भारताला बॅटिंगची संधी दिली. टीम इंडियासाठी इशान किशन आणि हार्दिक पंड्या या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. इशानने सर्वाधिक 61 धावांचं योगदान दिलं. हार्दिकने 28 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 52 धावांची चाबूक खेळी केली. तर संजू सॅमसन, शिवम दुबे आणि तिलक वर्मा या तिघांनी निर्णायक योगदान दिलं. संजू, शिवम आणि तिलक या तिघांनी अनुक्रमे 22, 23 आणि 25 अशा धावा केल्या. भारताने अशाप्रकारे 9 विकेट्स गमावून 209 रन्स केल्या. नामिबियासाठी गेरहार्ड इरास्मस याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या.

नामिबियाची कडक सुरुवात

लॉरेन स्टीनकॅम्प जॅन फ्रायलिंक या सलामी जोडीने 210 धावांचा पाठलाग करताना नामिबियाला आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघांनी 33 धावा जोडल्या. त्यानंतर जॅन 22 रन्सवर आऊट झाला. लॉरेन स्टीनकॅम्प आणि लॉफ्टी-ईटन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 34 रन्सची पार्टनरशीप केली. लॉरेन स्टीनकॅम्प याने 29 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. इथून टीम इंडियाने नामिबियाला ठराविक अंतराने झटके देण्याची सुरुवात केली आणि डाव गुंडाळला.

टीम इंडियाची बॉलिंग

टीम इंडियाकडून नामिबिया विरुद्ध एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. भारताच्या सर्व गोलंदाजांनी विकेट मिळवली. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. बॅटिंगने चमक दाखवणाऱ्या हार्दिक पंड्या याने बॉलिंगनेही योगदान दिलं. हार्दिक आणि अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवून नामिबियाचं पॅकअप करण्यात योगदान दिलं.