IND vs NZ Final : डॅरेल मिचेल-मायकल ब्रेसवेलचं अर्धशतक, टीम इंडियासमोर 252 धावांचं आव्हान

India vs New Zealand Champions Trohy Final 2025 1st Innings Highlights : न्यूझीलंडसाठी डॅरेल मिचेल याने अंतिम सामन्यात सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. त्यानंतर मायकल ब्रेसवेल याने महत्तवपूर्ण खेळी केली.

IND vs NZ Final : डॅरेल मिचेल-मायकल ब्रेसवेलचं अर्धशतक, टीम इंडियासमोर 252 धावांचं आव्हान
Daryl Mitchell Fifty IND vs NZ Final Ct 2025
Image Credit source: blackcaps x account
| Updated on: Mar 09, 2025 | 6:25 PM

न्यूझीलंडने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर 252 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 251 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी डॅरेल मिचेल याने सर्वाधिक धावा केल्या. मिचेलने 63 धावा केल्या. मायकल ब्रेसवेल यानेही अर्धशतकी खेळी केली. तसेच इतर फलंदाजांनाही चांगली आणि अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्याआधीच मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. भारतीय गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडली. त्यानंतर आता भारतीय फलंदाजांवर सर्व जबाबदारी असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांकडून क्रिकेट चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. आता ही अनुभवी जोडी विजयी धावांचा पाठलाग करताना कशी बॅटिंग करतात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या विल यंग आणि रचीन रवींद्र या सलामी जोडीने 57 धावांची भागीदारी केली. वरुण चक्रवर्ती याने ही जोडी फोडली. वरुणन विल यंगला 15 धावांवर बाद केलं. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला अपवाद वगळता ठराविक अंतराने झटके दिले.

रचीन रवींद्र टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत असल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. मात्र कुलदीप यादव याने आपल्या कोट्यातील पहिल्याच ओव्हरमधील पहिल्या बॉलवर रचीनला 37 रन्सवर क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर केन विलियमसन 11, टॉम लॅथम 14, ग्लेन फिलिप्स याने 34 धावा केल्या. भारतीय गोलंदाज न्यूझीलंडला झटके देत होते. तर डॅरेल मिचेल याने एक बाजू लावून धरली होती. मिचेलने एकेरी-दुहेरी धाव आणि संधी मिळेल तेव्हा चौकार ठोकून अर्धशतक पूर्ण केलं. मात्र मोहम्मद शमी याने अर्धशतकानंतर डॅरेलला रोखणयात यश मिळवलं. शमीने डॅरेलला 63 धावांवर कॅप्टन रोहित शर्मा याच्या हाती आऊट केलं. तर कॅप्टन मिचेल सँटनर 8 धावांवर रन आऊट झाला.

तसेच मायकल ब्रेसवेल यानेही निर्णायक अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडला 250 पार मजल मारता आली. ब्रेसवलने 40 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 53 रन्स केल्या. तर नॅथन स्मिथ झिरोवर नाबाद परतला. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

टीम इंडियासमोर २५२ धावांचं आव्हान

टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के आणि नॅथन स्मिथ