
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 2026 मधील पहिली आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका कोण जिंकणार? हे रविवारी स्पष्ट होणार आहे. उभयसंघात खेळवण्यात येत असलेली ही मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. यजमान टीम इंडियाने विजयी सलामी देत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. भारताने बडोद्यात 301 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं आणि सामना जिंकला होता. त्यामुळे भारताला सलग दुसरा सामना जिंकून मालिका सुरक्षित करण्याची संधी होती. मात्र न्यूझीलंडने दुसऱ्या आणि करो या मरो सामन्यात कमबॅक करत विजय मिळवला. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात मालिका विजेता ठरणार आहे. त्यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात क्रिकेट चाहत्यांना रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना कुठे आणि कधी पाहायला मिळेल? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना रविवारी 18 जानेवारीला होणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये होणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह सामना पाहता येईल.
दरम्यान टीम इंडियाने इंदूरमधील होळकर स्टेडियम एकदिवसीय सामन्यांत जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत या मैदानात एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने या मैदानात खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत. भारताने 2006 पासून ते 2023 पर्यंत या मैदानात एकूण 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारत त्या सातही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे भारत रविवारी या मैदानात सलग आठवा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.