
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही या मालिकेत खेळणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना या मालिकेची प्रतिक्षा आहे. तसेच नियमित कर्णधार शुबमन गिल याचं दुखापतीनंतर पुनरागमन झालं आहे. उपकर्णधार आणि मुंबईकर फलंदाज श्रेयस यालाही निवड समितीने या एकदिवसीय मालिकेसाठी संधी दिली आहे. मात्र श्रेयस खेळणार की नाही? हे त्याच्या फिटनेसवरुन अवलंबून असल्याचं बीसीसीआयने नमूद केलं होतं. श्रेयस फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तरच त्याला खेळता येईल, असं बीसीसीआयने न्यूझीलंड विरुद्धचा संघ जाहीर केल्यांनतर प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं होतं. आता श्रेयसच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. श्रेयसला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कॅच घेताना दुखापत झाली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आहे. बंगळुरुस्थित बीसीसीआय सीओईकडून श्रेयस फिट असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता श्रेयसला न्यूझीलंड विरुद्ध खेळता येणार आहे. मात्र याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय सीओए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांना इमेलद्वारे श्रेयसच्या फिटनेसबाबत माहिती दिली. श्रेयस न्यूझीलंड विरुद्ध मालिकेत खेळण्यासाठी फिट असल्याचं लक्ष्मण यांनी आगरकर यांना कळवलं आहे. बीसीसीआय सीओएच्या या मेलनंतर आता श्रेयसचं रिहॅब संपलंय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे श्रेयसच्या कमबॅकची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.
श्रेयसने त्याआधी मंगळवारी 6 जानेवारीला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 2025-2026 या हंगामात हिमाचल प्रदेश विरुद्ध कमबॅक केलं. श्रेयसने या सामन्यात मुंबईचं नेतृत्व केलं. श्रेयसने या सामन्यात 82 धावांची खेळी करत आपला फिटनेसही दाखवून दिला. श्रेयससाठी टीम इंडियातील कमबॅकच्या दृष्टीने हा सामना निर्णायक होता. निवड समितीचं या सामन्यात श्रेयसच्या फिटनेसकडे बारीक लक्ष होतं. मात्र श्रेयस अय्यर फिटनेसच्या कसोटीत पास झाला. तसेच श्रेयसने मुंबईला विजयही केलं.
दरम्यान श्रेयसला न्यूझीलंड विरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास त्याचं ऑक्टोबर 2025 नंतर भारतीय संघात पुनरागमन होईल. श्रेयस 25 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या सामना खेळला होता. श्रेयसला त्या सामन्यात कॅच घेताना दुखापत झाली होती. श्रेयस तेव्हापासून टीम इंडियातून बाहेर आहे.