Shreyas Iyer : कर्णधार बदलला, श्रेयस अय्यरला कमबॅक होताच नेतृत्वाची जबाबदारी, क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय
Shreyas Iyer Captaincy : भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. श्रेयस त्याआधी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहे. श्रेयसला या स्पर्धेतील 2 सामन्यांसाठी कर्णधार करण्यात आलं आहे.

टीम इंडिया 11 जानेवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टीम इंडियात या मालिकेतून दुखापतीनंतर श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल या दोघांचं कमबॅक झालं आहे. शुबमन गिल याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तर श्रेयसला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुखापत झाली होती. श्रेयसला न्यूझीलंड विरुद्ध खेळण्यासाठी फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. मात्र त्याआधी श्रेयसला मोठी जबाबदारी मिळाली आहे. श्रेयसला थेट कर्णधार करण्यात आलं आहे. हंगामी कर्णधाराला झालेल्या दुखापतीमुळे क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामने खेळवण्यात येत आहेत. श्रेयस देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. श्रेयसच्या अनुपस्थितीत शार्दूल मुंबईच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत होता. मात्र श्रेयसचं कमबॅक झालं आणि शार्दूलला दुखापत झाली. शार्दूलला दुखापतीमुळे 2 सामन्यांमध्ये खेळता येणार नाही. त्यामुळे आता श्रेयस 2 सामन्यांत मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.
श्रेयससाठी निर्णायक सामना
मुंबई विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील आपला पुढील सामना हा मंगळवारी 6 जानेवारीला खेळणार आहे. मुंबईसमोर हिमाचल प्रदेशचं आव्हान असणार आहे. श्रेयससाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. बीसीसीआय निवड समितीने काही दिवसांआधी न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला. श्रेयस फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तरच त्याला या मालिकेत खेळता येईल, असं बीसीसीआयने त्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं होतं. त्यामुळे श्रेयससाठी हिमाचल प्रदेश विरुद्धचा सामना महत्त्वाचा असणार आहे. निवड समितीचं हिमाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात श्रेयसवर फिटनेसच्या हिशोबाने बारीक नजर असणार आहे. त्यामुळे श्रेयस न्यूझीलंड विरुद्ध खेळणार की नाही? हे हिमाचल प्रदेश विरूद्धच्या सामन्यातून ठरेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
श्रेयससाठी धावा करणं गरजेचं
श्रेयसवर आता कर्णधार आणि फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी आहे. मुंबईला गेल्या सामन्यात महाराष्ट्र विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. महाराष्ट्रने सलग 4 सामने जिंकणाऱ्या मुंबईला पराभूत केलं होतं. त्यामुळे श्रेयससमोर मुंबईला पुन्हा विजयी ट्रॅकवर आणण्याचं आव्हान असणार आहे.
श्रेयसची VHT मधील कामगिरी
दरम्यान श्रेयस अय्यर याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात फर्स्ट क्लास कामगिरी केली आहे. श्रेयसने 40 डावांत 60 पेक्षा अधिक सरासरीने 1 हजार 829 धावा केल्या आहेत. श्रेयसने या स्पर्धेत एकूण 7 शतकं आणि 7 अर्धशतकं झळकावली आहेत.
