
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेला 21 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. न्यूझीलंडचं एकदिवसीय मालिकेनंतर टी 20I सीरिज नावावर करण्याचा प्रयत्न आहे. तर टीम इंडियासमोर टी 20I मालिकेत विजय मिळवून वनडे सीरिजमधील पराभवाची परतफेड करण्याचं आव्हान आहे. त्यामुळे या मालिकेत क्रिकेट चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड या दोघांत टी 20I क्रिकेटमध्ये वरचढ कोण आहे? हे आकड्यांतून जाणून घेऊयात.
टी 20I क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध एकूण 25 सामने खेळले आहेत. भारताने या 25 पैकी सर्वाधिक 14 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 10 वेळा भारताला पराभूत केलं आहे. तर उभयसंघातील 1 सामना टाय झाला आहे.
मायदेशातील आकडेवारी पाहता टीम इंडियाच सरस आहे. भारताने मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 7 टी 20 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडला घरच्या मैदानात 4 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करण्यात यश आलं आहे.
टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात आणि एकूण सर्वाधिक सामने जिंकण्यात आघाडीवर आहे. मात्र टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध त्रयस्थ ठिकाणी आपली छाप सोडता आलेली नाही. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात त्रयस्थ ठिकाणी 2 सामने खेळवण्यात आले आहेत. न्यूझीलंडने या दोन्ही सामन्यात भारतावर मात केली आहे.
दरम्यान टीम इंडिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांची आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेआधीची ही शेवटची मालिका आहे. न्यूझीलंडने भारताला एकदिवसीय मालिकेत 2-1 ने धुळ चारली आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडने प्रमुख खेळाडूंशिवाय ही कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा विश्वास दुणावलेला आहे. तर भारतावर कुठेतरी मालिका पराभवानंतर दबाव आहे. त्यामुळे टीम इंडियाचा न्यूझीलंडला 5 सामन्यांच्या मालिकेत लोळवत वनडे सीरिजमधील पराभवाचा हिशोब करण्याचा प्रयत्न असणार आहे. आता यात टीम इंडिया किती यशस्वी ठरते हे पाचव्या आणि अंतिम सामन्यानंतरच स्पष्ट होईल.