
टीम इंडियातील बहुतांश खेळाडू सध्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 2025-2026 या मोसमातील आपला शेवटचा सामना खेळणार आहेत. त्यानंतर हे खेळाडू टीम इंडियाच्या गोटात दाखल होणार आहेत. टीम इंडिया 2026 या वर्षातील आपली पहिली एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. न्यूझीलंड आणि भारतीय संघाने या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. या मालिकेतील सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहेत. शुबमन गिल भारतीय संघाचं या मालिकेतून पुन्हा एकदा कर्णधार म्हणून सूत्र स्वीकारणार आहे. शुबमनचं दुखापतीनंतर न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेतून कमबॅक झालं आहे. शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापत झाली होती. त्यामुळे शुबमनला उर्वरित मालिकेतून बाहेर व्हावं लागलं होतं. मात्र आता शुबमन सज्ज झाला आहे. तर मायकल ब्रेसवेल हा न्यूझीलंडच्या एकदिवसीय संघाची जबाबदारी पार पाडणार आहे.
भारत-न्यूझीलंड उभयसंघात मालिकेतील पहिला सामना हा 11 जानेवारीला होणार आहे. हा सामना बडोद्यात होणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू लवकरच या स्टेडियममध्ये पोहचून सरावाला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर 2 दिवसांनी दुसरा सामना होणार आहे. हा सामना 14 जानेवारीला राजकोटमध्ये होणार आहे. तसेच तिसऱ्या आणि अंतिम सामन्याचं आयोजन हे इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. हा सामना 18 जानेवारी होणार आहे.
प्रत्येक क्रिकेट संघाचा सर्वच सामने जिंकण्याचा प्रयत्न असतो. मात्र तसं होत नाही. मात्र नववर्षाची सुरुवात विजयाने करावी, असा प्रत्येक संघाचा मानस असतो. आता या एकदिवसीय मालिकेतून यजमान टीम इंडिया विजयी सुरुवात करण्यात यशस्वी ठरणार की पाहुणे मैदान मारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 1 वाजता नाणेफेकीचा कौल लागणार आहे. तसेच वेळेत सुरुवात झाल्यास सामन्याची रात्री 9 वाजता सांगता होईल.
दरम्यान या मालिकेत क्रिकेट चाहत्यांचं सर्वाधिक लक्ष हे भारताची अनुभवी आणि स्टार जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांकडे असणार आहे. रोहित आणि विराट हे दोघेही फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एकदिवसीय सामने खेळतात. त्यामुळे या दोघांच्या सामन्यांची चाहत्यांना कायम प्रतिक्षा असते. दोघांनी भारताच्या अखेरच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सरस कामगिरी केली होती. आता हे दोघे नववर्षातील पहिल्या मालिकेत फलंदाज म्हणून कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.