
पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहान याने टीम इंडिया विरुद्ध 21 सप्टेंबरला सुपर 4 मॅचमध्ये अर्धशतक ठोकल्यांनतर गन सेलीब्रेशन केलं होतं. साहिबजादाने त्यानंतर आता आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध पुन्हा अर्धशतक ठोकलं आहे. साहिबजादाने 35 बॉलमध्ये 50 रन्स केल्या. त्यामुळे साहिबजादा अर्धशतकानंतर बॅटसोबत काय करतो? याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. मात्र साहिबजादाने गेल्या सामन्याप्रमाणे आता बॅटसोबत तसं केलं नाही. साहिबजादाने एका हातात बॅटचा मधील भाग पकडत अर्धशतकी जल्लोष केला.
साहिबजादाने 21 सप्टेंबरला टीम इंडिया विरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर बॅट हवेत धरत फायरिंग केली होती. साहिबजादाने टीम इंडिया विरुद्ध गेल्या सामन्यात अर्धशतकानंतर जाणीवपूर्वक गन सेलीब्रेशन करत भारताच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला, असा दावा करण्यात येत होता. त्यामुळे भारतीयांकडून हा बॅट्समन आहे की दहशतवादी असा संतप्त प्रश्न देशवासियांकडून उपस्थित करण्यात आला होता. साहिबजादाने केलेल्या या विकृत जल्लोषामुळे त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. साहिबजादाच्या या कृतीमुळे चांगलाच वाद पेटला होता.
त्यानंतर आता रविवारी 28 सप्टेंबरला महाअंतिम सामन्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये टीम इंडियाने टॉस जिंकून पाकिस्तान बॅटिंगसाठी भाग पाडलं. साहिबजादा फरहान आणि फखर झमान या सलामी जोडीने पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पावरप्लेचा फायदा घेत ठिकठाक फटकेबाजी केली. या दरम्यान साहिबजादा आणि फखर या दोघांनी सलामी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी चौकार-षटकार मारुन पाकिस्तानच्या चांगल्या स्थितीत आणून ठेवलं.
साहिबजादाने या दरम्यान नवव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर अर्धशतक पूर्ण केलं. साहिबजादाने 142. 86 च्या स्ट्राईक रेटने 35 चेंडूत अर्धशतक झळकावलं. साहिबजादाचं हे टीम इंडिया विरुद्धचं सलग दुसरं टी 20i अर्धशतक ठरलं. साहिबजादाने या अर्धशतकी खेळीत 2 षटकार आणि 5 चौकार लगावले. साहिबजादाने या अर्धशतकानंतर बॅट हवेत उंचावली. साहिबजादा बॅट उंचावल्यानंतर काय करतोय? याकडे भारतीयांची बारीक नजर होती. मात्र साहिबजादाने तसं काही केलं नाही.
दरम्यान साहीबजादा अर्धशतकानंतर दुसऱ्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. वरुण चक्रवर्ती याने दहाव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर ही सेट झालेली जोडी फोडली. वरुणने साहिबजादाला कुलदीप यादव याच्या हाती कॅच आऊट केलं. साहिबजादा 38 बॉलमध्ये 57 रन्सवर आऊट झाला.