IND vs SA : भारताने पहिल्या कसोटीदरम्यान कर्णधार बदलला, अचानक असा निर्णय का?

Shubman Gill Test Team India Captain : शुबमन गिल याला दुसर्‍या दिवशी पहिल्या डावात बॅटिंग दरम्यान मानेला त्रास जाणवला. त्यामुळे शुबमनला सामन्यातील तिसऱ्या डावात उतरता आलं नाहीय.

IND vs SA : भारताने पहिल्या कसोटीदरम्यान कर्णधार बदलला, अचानक असा निर्णय का?
Shubman Gill Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 15, 2025 | 3:53 PM

कोलकातामधील ऐतिहासिक इडन गार्डन्समध्ये टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेला 159 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारुन भक्कम आघाडी घेण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताला तसं करण्याआधीच रोखलं. दक्षिण आफ्रिकेने भारताला दुसऱ्या दिवशी 189 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यामुळे भारताला केवळ 30 धावांचीच आघाडी घेता आली. या सामन्यादरम्यान अचानक भारताचा कर्णधार बदलण्यात आला आहे. नक्की असा निर्णय का घेण्यात आला? याबाबत जाणून घेऊयात.

भारताने पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदर याच्या रुपात दुसरी विकेट गमावली. त्यानंतर टीम इंडियाचा नियमित कर्णधार शुबमन गिल बॅटिंगसाठी आला. शुबमन गिल याने 3 चेंडूत एकमेव चौकारासह 4 धावा केल्या. शुबमनला या दरम्यान बॅटिंग करताना मानेला त्रास जाणवला. त्यामुळे शुबमनला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने भारताला झटपट झटके दिले. भारताने अक्षर पटेल याच्या रुपात नववी विकेट गमावली. त्यामुळे शुबमन बॅटिंगसाठी येणार की नाही? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र शुबमन मानेच्या त्रासामुळे मैदानात आला नाही. यासह भारताचा 189 धावांवर डाव आटोपला. नियमांनुसार, रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेलेल्या फलंदाजाला नवव्या विकेटनंतरच मैदानात बॅटिंग करता येते.

…आणि भारताचा कर्णधार बदलला

शुबमन बॅटिंगसाठी न आल्याने आता सामन्यातील तिसऱ्या डावात भारताचं नेतृत्व कोण करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. ऋषभ पंत भारताचा उपकर्णधार आहे. त्यामुळे टीम इंडिया ऋषभ पंतच्या नेतृत्वात फिल्डिंगसाठी उतरली.

भारताचा हुकमी एक्का मानेच्या त्रासामुळे मैदानाबाहेर

गोलंदाजांचा बोलबाला, फलंदाज ढेर

दरम्यान या पहिल्या कसोटीत आतापर्यंत गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. तर दोन्ही संघांचे फलंदाज ढेर झाले. भारतीय गोलंदाजानी दक्षिण आफ्रिकेला 159 रन्सवर रोखलं. तर भारताला प्रत्युत्तरात 30 धावाच जास्त करता आल्या. सामन्यातील पहिल्या 2 डावातील 39 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. भारतासाठी केएल राहुल याने सर्वाधिक 39 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मारक्रम याने सर्वाधिक 31 रन्स केल्या. त्यामुळे आता पुढील 2 डावात काय होतं? याकडे क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे.