IND vs SA : रायपूरमध्ये कुणामुळे पराभव? इरफान पठाण याने थेट नावच घेतलं, काय म्हणाला?

Irfan Pathan on IND vs SA 2nd Odi : इरफान पठाण याने रवींद्र जडेजा याने केलेल्या खेळीवरुन प्रतिक्रिया दिली. जडेजाच्या संथ खेळीमुळे कसा परिणाम झाला? हे इरफानने सांगितलं. जाणून घ्या.

IND vs SA : रायपूरमध्ये कुणामुळे पराभव? इरफान पठाण याने थेट नावच घेतलं, काय म्हणाला?
Irfan Pathan on Ravindra Jadeja
Image Credit source: PTI and Bcci
Updated on: Dec 04, 2025 | 11:07 PM

रायपूरमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियावर चौफेर टीका केली जात आहे. भारताला या सामन्यात 358 धावा केल्यानंतरही पराभूत व्हावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने ऐतिहासिक 359 धावांचा पाठलाग करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर रांचीत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 17 धावांनी मात करत विजयी सलामी दिली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी दुसरा सामना हा करो या मरो असा होता. भारताने 358 धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे टीम इंडिया हा सामना जिंकेल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी विक्रमी धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि मैदानं मारलं.

भारताच्या दुसर्‍या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने ऑलराउंडर रवींद्र जडेजा याच्यावर निशाणा साधला आहे. इरफानने जडेजाच्या कामगिरीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

टीम इंडियाला दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात एक वेळ 400 पार पोहचण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या 10 ओव्हरमध्ये धावांवर ब्रेक लावला. त्यामुळे टीम इंडियाला 400 धावांचा टप्पा गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर भारताला शेवटच्या 60 बॉलमध्ये 74 रन्स करता आल्या. जडेजाने या सामन्यात केएल राहुल याच्यासोबत अर्धशतकी भागीदारी केली. मात्र जडेजाला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. जडेजाला 100 च्या स्ट्राईक रेटनेही धावा करता आल्या नाहीत. जडेजाने 27 बॉलमध्ये 24 रन्स केल्या. इरफानने याच मुद्द्यावरुन जडेजावर टीकेची तोफ डागली.

इरफान काय म्हणाला?

“माझ्या नजरेस एक समस्या आली. रवींद्र जडेजाने त्याच्या खेळीत 27 बॉलमध्ये 24 धावा केल्या. ही फार संथ खेळी आहे. यामुळे टीम इंडियाला फटका बसू शकतो, असं आम्ही कॉमेंट्री दरम्यान बोलत होतो. शेवटची तसंच झालं. तुम्ही 300 पेक्षा अधिक धावा करुन चांगल्या स्थितीत आहात. तसेच प्रत्येक फलंदाज 100 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने खेळत आहे. तसेच तुमचा स्ट्राईक रेट 88 इतका आहे. तर यावरुन त्या खेळीत तत्परतेचा अभाव असल्याचं स्पष्ट होतं. कधी-कधी संथ खेळी होऊ शकते. मात्र जडेजाचा हेतू निराशाजनक होता”, असं इरफानने नमूद केलं. इरफानने त्याच्या युट्यूब चॅनेलवरुन हे विश्लेषण केलं.