
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20I सामन्याचं आयोजन हे बुधवारी 17 डिसेंबरला लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. हा सामना तब्बल 6 वेळा पाहणी केल्यानंतर टॉसविना रद्द करण्यात आला. लखनौतील धुक्यांमुळे हा सामना होऊ शकला नाही. धुक्यांमुळे दृष्यमानता कमी होते. त्यामुळे फिल्डिंग करताना खेळाडूंना समस्या उद्भवते. त्यामुळे पंचांकडून ठराविक अंतराने दृष्यमानता योग्य आहे की नाही? याची पाहणी करण्यात आली. मात्र अखेरपर्यंत धुक्यांमुळे दृष्यमानता सामना होण्यासाठी पूरक नव्हती. त्यामुळे हा सामना नाईलाजाने रद्द करावा लागला. त्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली. चाहत्यांनी बीसीसीआयवर संताप व्यक्त केला.
आता क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्याची प्रतिक्षा आहे. मालिकेतील पाचवा सामना हा 19 डिसेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यात अहमदाबादमध्ये हवामान कसं असेल? हे आपण जाणून घेऊयात.
अहमदाबादमध्ये सामन्याच्या दिवशी हवामान स्वच्छ असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे चाहत्यांना चिंता करण्याची गरज नाही. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये 19 डिसेंबरला आकाश निरभ्र राहिल. तर तापमान 15 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहिल. तसेच अहमदाबादमधील हवा निर्देशांक हा 100 ते 120 दरम्यान राहिल. त्यामुळे सामना निकाली निघण्याची पूर्ण शक्यता आहे.
दरम्यान टीम इंडियाची अहमदाबादमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे. टीम इंडियाने आतापर्यंत या मैदानात एकूण 7 टी 20i सामने खेळले आहेत. टीम इंडियाने या 7 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 2 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाने भारतावर मात केली आहे. त्यामुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाने 2025 या वर्षात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. भारताने 2025 या वर्षात आतापर्यंत 20 सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर भारताला 3 वेळा पराभूत व्हावं लागलं. तर 2 सामने हे रद्द झाले.