
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी निराशा केली. भारतीय फलंदाजांनी दोन्ही सामन्यात 300 पेक्षा अधिक धावा केल्या. भारताने पहिल्या सामन्यात 349 धावा केल्या. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला 17 धावांनीच विजय मिळवता आला. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे गोलंदाज 358 धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरले. एकूणच पाहता भारताच्या गोलंदाजांनी दोन्ही सामन्यात सुमार कामिगरी केली. यामुळे भारताला दुसरा सामना जिंकता आला नाही. परिणामी दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.
टीम इंडियाला रायपूरमध्ये 358 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर टीम इंडियावर टीका केली जात आहे. टीम इंडियाला आधीच मायदेशात कसोटी मालिका 0-2 अशा एकतर्फी फरकाने गमवावी लागली आहे. त्यात आता एकदिवसीय मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे टीम इंडियावर मालिका पराभवाची टांगती तलवार आहे. अशात आता तिसरा आणि अंतिम सामना मालिकेच्या हिशोबाने निर्णायक ठरणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं निश्चित आहे.
टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये किमान 1 बदल गरजेचा आहे. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा याने दोन्ही सामन्यात धावा लुटवल्या. त्यामुळे प्रसिधचा तिसऱ्या सामन्यातून पत्ता कट होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. तर प्रसिधच्या जागी ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याचा समावेश केला जाऊ शकतो. नितीश ऑलराउंडर असल्याने बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही बाजूने तो योगदान देऊ शकतो.
कॅप्टन केएलने नितीश आणि वॉशिंग्टन सुंदर या ऑलराउंडर जोडीचा बॉलिंगसाठी योग्य वापर केल्यास धावा रोखता येऊ शकतात. केएलने सुंदरचा पहिल्या 2 सामन्यात बॉलिंगने हवा तसा उपयोग करुन घेतला नाही. केएलने पहिल्या 2 सामन्यात सुंदरला फक्त 7 ओव्हर बॉलिंग करण्याची संधी दिली. सुंदरने या 7 ओव्हरमध्ये 46 धावा दिल्या. त्यामुळे आता प्रसिधला तिसऱ्या सामन्यातून बाहेर केल्यास त्याच्या जागी कुणाला संधी मिळणार? याकडेच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा.