
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी 20I सामन्यात कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. उभयसंघातील 5 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाने या मालिकेत विजयाने सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता मालिकेच्या दृष्टीने तिसरा सामना हा अत्यंत निर्णायक असा ठरणार आहे. तिसरा सामना जिंकणाऱ्या संघाला मालिका विजयासाठी उर्वरित 2 पैकी 1 सामना जिंकावा लागणार आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला मालिका जिंकण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये या सामन्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
उभयसंघातील तिसरा टी 20i सामना 14 डिसेंबरला धर्मशाला येथील स्टेडियममध्ये होणार आहे. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार असल्याचं जवळपास निश्चित म्हटलं जात आहे. त्यामुळे आता सूर्या कुणाला डच्चू देणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल पहिल्या 2 सामन्यात ठार अपयशी ठरला. त्यानंतरही शुबमनला संधी मिळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. तसं झाल्यास पुन्हा एकदा अभिषेक शर्मा आणि शुबमन हे दोघे ओपनिंगला येतील.
दुसऱ्या सामन्यात बॅटिंग ऑर्डरमध्ये केलेले अनावश्यक बदल हे 1 टीम इंडियाच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. अक्षर पटेल तिसऱ्या, सूर्यकुमार यादव चौथ्या तिलक वर्मा पाचव्या आणि शिवम दुबे थेट आठव्या स्थानी बॅटिंगला आले. त्यानंतर आता टीम मॅनेजमेंट तिसऱ्या टी 20i सामन्यात चूक दुरुस्त करतील, अशी आशा चाहत्यांना आहे.
कॅप्टन सूर्यकुमार त्याच्या हक्काच्या आणि नेहमीच्या तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी येऊ शकतो. तिलक वर्मा याला चौथ्या स्थानी बॅटिंगची संधी मिळू शकते. तिलकने दुसऱ्या सामन्यात सर्वाधिक 62 धावा केल्या होत्या.
ऑलराउंडर हार्दिक पंड्या याला पाचव्या स्थानी बॅटिंगची संधी मिळू शकते. जितेश शर्मा सहाव्या स्थानी येऊ शकतो. याचाच अर्थ असा की संजूला तिसऱ्या सामन्यातही संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. तसेच अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह हे प्लेइंग ईलेव्हनमध्ये कायम असतील.
मुंबईकर ऑलराउंडर शिवम दुबे याला बॅटिंग आणि बॉलिंगने काही खास करता आलेलं नाही. त्यामुळे शिवमच्या जागी कुलदीप यादव याचा समावेश केला जाऊ शकतो.
तिसऱ्या टी 20i मॅचसाठी टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह.