IND vs SA : केएलची वनडेत कसोटी, कॅप्टन म्हणून कामगिरी कशी? पाहा आकडेवारी

India vs South Africa Odi Series 2025 : कसोटी मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचे वेध लागले आहेत. उभयसंघात एकूण 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत.

IND vs SA : केएलची वनडेत कसोटी, कॅप्टन म्हणून कामगिरी कशी? पाहा आकडेवारी
KL Rahul Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 28, 2025 | 6:17 PM

टीम इंडिया कसोटी मालिका गमावल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत 2 हात करणार आहे. उभयसंघात एकूण 3 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. शुबमन गिल याच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाज केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. शुबमनच्या दुखापतीमुळे केएलला अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा नेतृत्वाची जबाबदारी मिळाली आहे. या मालिकेनिमित्ताने केएलने भारतीय संघाचं किती सामन्यांमध्ये नेतृत्व केलंय? केएल कर्णधार म्हणून किती यशस्वी आहे? हे आपण आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

शुबमन गिल याला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळता येणार नाहीय. शुबमनची या मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाही. शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकातातील कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. शुबमनला या दुखापतीमुळे दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यातही खेळता आलं नाही. त्यामुळे केएलला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कॅप्टन केएलचे वनडे क्रिकेटमधील आकडे

केएलने आयपीएलमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व केलंय. मात्र केएलला एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा फारसा अनुभव नाही. केएलने भारताचं 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. केएलने भारताला 8 सामन्यांमध्ये विजयी केलं आहे. तर प्रतिस्पर्धी संघांनी भारताला 4 वेळा पराभवाची धुळ चारली आहे. केएलची कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमधील विजयी टक्केवारी ही 67 टक्के इतकी आहे.

केएलसमोर आव्हान काय?

दक्षिण आफ्रिकेने भारताला कसोटी मालिकेत 2-0 ने व्हाईटवॉश केलंय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा विश्वास वाढलेला आहे. दक्षिण आफ्रिका भारताला कसोटीनंतर वनडे मालिकेतही त्याच विश्वासाने पराभूत करण्यासाठी उतरणार आहे. टेम्बा बवुमा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे केएलसमोर दक्षिण आफ्रिकेची विजयी घो़डदौड रोखण्याचं आव्हान असणार आहे.

वनडे मालिकेत आव्हान काय?

शुबमन व्यतिरिक्त उपकर्णधार श्रेयस अय्यर हा देखील एकदिवसीय मालिकेचा भाग नाही. श्रेयसला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळता येणार नाही. शुबमन आणि श्रेयस नसल्याने भारताला मोठा झटका आहे. मात्र केएलला विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीकडून मदत मिळेल. मात्र या अनुभवी जोडीचा उपयोग कसा करुन घ्यायचा? हे आव्हान केएलसमोर असणार आहे.

तसेच प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही? हे देखील केएलला ठरवावं लागणार आहे. तसेच केएलला आता नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्याने त्याला आणखी जबाबदारी खेळावं लागणार आहे.