IND vs SA : रोहित शर्मा याला 5 विक्रम करण्याची संधी, हिटमॅन 3 सामन्यांत काय करु शकतो?

Rohit Sharma Records : रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात शतकी खेळी केली होती. त्यामुळे रोहितकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही अशाच तोडफोड खेळीची आशा असणार आहे.

IND vs SA : रोहित शर्मा याला 5 विक्रम करण्याची संधी, हिटमॅन 3 सामन्यांत काय करु शकतो?
Team India Rohit Sharma
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 29, 2025 | 10:55 PM

टीम इंडियाचा यशस्वी फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेनंतर वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. रोहितने या मालिकेसाठी कंबर कसली आहे. रोहितने पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. टीम इंडिया या मालिकेत केएल राहुल याच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. शुबमन गिल याला मानेच्या दुखापतीमुळे या मालिकेत खेळता येणार नाहीय. अशात केएलला विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी जोडीची साथ मिळेल, यात शंका नाही.

रोहितला या मालिकेत थोडेथोडके नाही तर तब्बल 5 विक्रम करण्याची संधी आहे. तसेच रोहितला त्याव्यितिरिक्त खास कामगिरी करण्याची संधी आहे. रोहित या 3 सामन्यांच्या मालिकेत काय काय करु शकतो? हे जाणून घेऊयात.

रोहितला सिक्सर किंग होण्याची संधी

  • रोहितला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी फक्त 3 सिक्सची गरज आहे. सध्या सर्वाधिक 351 षटकारांचा विक्रम हा शाहिद आफ्रिदी याच्या नावावर आहे.
  • रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करण्याची सुवर्णसंधी आहे. रोहितला त्यासाठी फक्त 98 धावांचीच गरज आहे. रोहितने आतापर्यंत 19 हजार 902 धावा केल्या आहेत.
  • तसेच रोहित ओपनर म्हणून 16 हजार धावा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. रोहितला त्यासाठी फक्त 213 धावांची गरज आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ओपनर म्हणून 15 हजार 787 धावा केल्या आहेत.
  • रोहितला भारतीय ओपनर म्हणून सर्वाधिक शतकांचा विक्रम करण्यासाठी 1 शतकाची गरज आहे. रोहितने आतापर्यतं 32 शतकं झळकावली आहेत. पाकिस्तानचा माजी सलामीवीर सलमान बट यानेही 32 शतकं केली आहेत.
  • रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा ओपनर होण्यासाठी 115 धावांची गरज आहे.
  • रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत 1 हजार 973 धावा केल्या आहेत. रोहितला या मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे.
  • रोहितला भारतात ओपनर म्हणून वनडेत 5 हजार धावांसाठी 133 रन्सची गरज आहे. रोहितने आतापर्यंत भारतात 4 हजार 867 धावा केल्या आहेत.
  • रोहितने त्याच्या कारकीर्दीत बहुतांश धावा या विजयात केल्या आहेत. रोहितला भारताच्या विजयात 12 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 30 रन्सची गरज आहे. रोहितने भारताच्या विजयात 30 धावा केल्यास अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई ओपनर ठरेल.
  • तसेच रोहितला सेना देशात (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) 5 हजार एकदिवसीय धावा करण्यासाठी 36 रन्सची गरज आहे.